भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यात ९ व १० सप्टेंबर रोजी झालेले अतिवृष्टीमुळे धान पिकाचे झालेले नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश आमदार यांनी आढावा सभेत तलाठी, सचिव व कृषी सहाय्यक यांना दिले. हे पंचनामे करताना गावातील काही लोक पंचनामे करणारे कर्मचाºयांवर दबाव टाकून आम्ही आमदारांची माणसं आहोत, सरसकट पंचनामे करा असे सांगून धमकावत असल्याने आम्ही आजपासून या कामावर बहिष्कार टाकत असून कामबंद करीत असल्याचे निवेदन दिले आहे. तिरोडा तालुक्यात ९ व १० सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे नदी नाले व तलावाचे पाणी शेतकºयांचे शेतात शिरुन मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाल्याने या नुकसान ग्रस्त शेतकºयांचे धानपिकाचे पंचनामे व्हावे म्हणून तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयकुमार रहांगडाले यांनी पंचायत समिती तिरोडाचे सभागृहात आढावा सभा घेऊन या सभेत नुकसान झालेले शेतकºयाचे धान पिकाचे पंचनामे संयुक्तरित्या ग्रामपंचायत सचिव तलाठी व कृषी सहाय्यक यांनी करून ग्रामपंचायतमध्ये याचे वाचन करावे असे आदेश दिले.
आदेशाची अंमलबजावणी करून तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी मोक्यावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली असता काही ठिकाणी काही स्थानिक पदाधिकारी व इतरांनी आम्ही आमदारांचे माणसे असून आम्ही सांगतो त्याच पद्धतीने सरसकट पंचनामे करा असे धमकावत असल्याने यामुळे वाद विवाद व भांडण तंटे होत असल्याने आम्हास शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. यामुळे आम्ही या सर्वेक्षण कामावर बहिष्कार टाकत असून आज दिनांक २४ सप्टेंबरपासून काम बंद करीत असल्याचे निवेदन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना विदर्भ पटवारी संघटना तिरोडाचे मंडळ अधिकारी व तलाठी तसेच तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यकांनी दिले आहे.