भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शालेय शिक्षण विभागाने काढलेला संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय अन्यायकारक आणि विद्यार्थ्यांसाठी बाधक असल्याचा ठपका ठेवीत २५ सप्टेंबर रोजी जिल्हयातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतल्याने जवळपास ७६५ शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान हा बंद मागे घ्यावा म्हणून झालेली बैठक फिसकटल्याने समितीने आपला निर्णय कायम ठेवला आहे. शालेय शिक्षण विभागाचा शिक्षक संच मान्यता व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा शासन निर्णय खेड्यापाड्यातील, वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. परिणामी दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत, अशी मागणी शिक्षकांची होती. दरम्यान यासाठी सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य स्तरावर घेण्यात आला होता. तरीही, या अनुषंगाने काही मार्ग निघतो यासाठी बैठक शिक्षक संघटना आणि प्रशासनात बैठक झाली. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने आता जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या ७६५ प्राथमिक शाळा बंद राहणार असल्याचे जिल्हा परिषद भंडारा शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.
२५ सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व शिक्षक किरकोळ रजा टाकून मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी उपस्थित राहण्याचीशक्यता आहे. यासाठी समितीच्या पदाधिकाºयांकडून आवाहन केले जात आहे. मोर्चा नगर परिषद गांधी विद्यालय भंडारा येथून दुपारी १२ वाजता निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भुते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर काकिरवार, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष फारुख शहा, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेश सातपुते, युवराज वंजारी, हेमंत पटले, अरविंद तिरपुडे, शंभू घरडे, सुधीर वाघमारे, पुरुषोत्तम झोडे यांनी केले आहे.