भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजाला पहिल्या दिवशी हुलकावणी देणारा पाऊस दुसºया दिवशी मात्र बरसला. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारीही कायम होता. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले तापमान पावसामुळे मोठ्या फरकाने खाली घसरले व उकाड्यापासून दिलासा मिळाला. हवामान विभागाने २६ सप्टेंबरपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र व इतर वातावरणीय परिस्थितीमुळे मध्य भारतासह इतरही भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. अंदाज असतानाही २३ सप्टेंबररोजी दिवसभर पावसाचा थेंबहीबरसला नाही. उलट वाढलेल्या तापमानामुळे प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. मध्यरात्री मात्र वातावरण बदलले आणि पावसाला सुरुवात झाली. २४ सप्टेंबरच्या सकाळी आकाश काळ्याभोर ढगांनी वेढले होते. पावसाचा जोर दुपारी ३ पर्यंत कायम होता. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. नागपुरात सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत २४ तासात २३ मि.मी. पावसाची नोंद झाली. भंडाºयात सर्वाधिक ३९ मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूरला सकाळपर्यंत बरसलेला पाऊस नंतर शांत होता. इतरही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागली.पावसामुळे नागरीकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.