भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : शासनाकडून ऐन सणास- ुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर वाढल्याने आता गृहिणींचे बजेट बिघडले असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे. खाद्यतेलाशिवाय स्वयंपाक कसा करावा असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. मात्र याचा अनपेक्षित फायदा येथील तेल कंपन्यांना झाला असून अधिक नफा मिळविण्यासाठी तेलात. भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने आधारभूत दरात सोयबीनच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढविल्याने अचानक खाद्य तेलाच्या किंमतीचा भडका उडाल्याने सोयाबीनच्या तेलाची किंमत आता १४५ रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे. या वाढत्या खाद्य तेलाच्या किंमती पाहून स्वयंपाकासाठी तेल वापरावे की नाही असा प्रश्न गृहिणी करू लागल्या आहेत. हाताला काम नसल्याने सर्वसामान्य वर्ग आधीच अडचणीत सापडलेला आहे. पाम तेलावरील वाढलेले आयात भाव आणि शेंगदाण्याची होत असलेली निर्यात यामुळे खाद्य तेलाच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे.
जवस, शेंगदाणा, सूर्यफूल, आदी खाद्यतेलांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मागील आठवड्यात ११५ ते १२० रुपये लिटर असलेले सोयबीन तेल आता बाजारात १४५ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. सर्वसाधारण कुटुंबांमध्ये सर्वाधिक सोयबीन तेलाचा वापर केला जात असल्याने वाढत्या महागाईने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सध्या तेलबियांचे नवीन पीक बाजारातयेण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी असतांना पुढील महिन्यापर्यंत भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. गेल्या वर्षीपासून महागाईच्या सावटामुळे सामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे कसेतरी ओढाताण करून जीवन जगत असलेले नागरिक आरोग्यावरील खर्चात तसेच गॅस सिलिंडरची दरवाढ, त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने महिलांना स्वयंपाकाची घडी बसविण्यासाठी मोठी अडचण जात आहे. अचानक खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका यामुळे खर्चाच्या बाबतीत सामान्य वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामूळे खाद्य तेलाचे भाव कमी करण्यात यावे अशी मागणी होत आहे. त्यामुळे शहरातील तेल कंपन्याना सुगीचे दिवस आले आहे.