भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नवरात्र उत्सव अवघ्या ६ दिवसांवर आला असताना तुमसर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. येत्या ३ आॅक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरवात होत आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीची हालचाल दिसत नाही. तुमसर- मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालय समोरील मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे पडले असूनरस्त्यांची दुरवस्था झाली आहे. एकूणच यंदा नवरात्र उत्सवात तुमसर शहरातील रस्ते नागरिकांसाठी भीतीदायक ठरणार आहेत. तुमसर शहरात प्रवेश करताना कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, जुना एसटी बस स्थानक मार्गावर मोठ्या प्रमाणातखड्डे पडले आहे.
पुढे नेहरू, बावनकर, मज्जीत चौक, सराफा लाईन समोरील रस्ताही खराब झाला आहे. पुढे जैन मंदिर चौकातही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे तुमसरसिहोरा-बपेरा मार्गाकडे जाणाºया रस्त्यावरही खड्डे पडल्याची वस्तुस्थिती आहे.
भंडारा-तुमसर मार्गावर अनेक अधिकारी व शासकीय कर्मचारी दररोज या रस्त्यावरून ये-जा करतात, शाळकरी मुलांचीही याच रस्त्यावरून ये-जा सुरू असते. वाहनांची सर्वाधिक वर्दळ असणाºया या रस्त्यांची अशी दुरवस्था झालेली असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्याचे गाºहाणे तुमसरकरांनी मांडले आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा शनिवारी तुमसर येथे येणार असून भंडारा रोडवरील रस्त्यांच्या दुरुस्तीचा विषय सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडून किती गांभीर्याने सोडविला जातो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष आहे.