भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : भजनाचा कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे परत असलेल्या भजनी मंडळाचा पिकअप वाहन नाल्यावरील पुराच्या पाण्यात वाहून नाल्यात पडलेल्या पिकअप वाहनाच्या अपघातात १८ जण किरकोळ जखमी झाले असून दोन चिमुकल्या मुली मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना साकोली तालुक्यातील खांबा वडेगाव येथे आज पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेतील प्रियांशी मोरेश्वर वाघाडे (५ वर्ष) नावाच्या चिमुकलीचे शव पथकाला मिळाले असून दुसरीचा शोध सुरू आहे. साकोली तालुक्यातील खांबा जांभळी येथील ताजमेहंदी भजनी मंडळ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी येथे काल्याच्या कार्यक्रमासाठी २६ सप्टेंबर रोजी गेलेहोते. रात्री भजनाचा कार्यक्रम आटोपून २७ सप्टेंबरला पहाटे ४ वाजता च्या दरम्यान खांबा निवासी चिरंजीव टेंभुर्णे यांच्या पिकअप क्र. एमएच १२ जेई ७१७३ ने सर्व आपल्या गावाकडे परत येत असताना पिक अप वाहन वडेगाव खांबा येथील नाल्यात उलटले. या पिकप वाहन मध्ये दोन चिमुकल्या मुलींसह १८ व्यक्तींचा समावेश होता.
या अपघातात दोन चिमुकल्या मुली नाल्या मधील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या तर १८ व्यक्तींना गावकºयांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. वाहून गेलेल्या दोन लहान मुलींचे नाव कु. नव्या इंद्रराज वाघाडे (वय ७ वर्ष) व कु. प्रियांशी मोरेश्वर वाघाडे (वय ५ वर्ष)अशी आहेत. तर पिकअप वाहन मध्ये अशोक टेकाम ४५, पुरुषोत्तम वाघाडे ४५, मडुदास चौधरी ५०, रामकृष्ण येडे ४४, भाऊलाल कळपते ५५, राजहंस वाघाडे ४२, लक्ष्मण सावरकर ६०, ऋषी वाघाडे ७३, बाबूलाल कळपते ५२, इंद्रराज वाघाडे ४०, सुभाष येडे ५२, रामप्रकाश पटले ३५, जयप्रकाश पटले ३७, आशा उदाराम येडे ४५, पार्वता ईश्वर वाघाडे ४०, देवला शिशुपाल मसराम ३८, भूमित्रा राजेंद्र निर्वाण ३१, सर्व राहणार खांबा, वाहन चालक-मालकचिरंजीव टेंभुर्णे ४२ वर्ष सर्व राहणार जांभळी/ भीवसेनटोला यांचा समावेश होता.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, तहसीलदार निलेश कदम, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश बडवाईक, मंडळ अधिकारी अजय धांडे, तलाठी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमू तसेच साकोली नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन चमू घटनास्थळी दाखल झाली व नाल्यात वाहून गेलेल्या दोन्ही चिमुकल्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली. यातील प्रियांशी मोरेश्वर वाघाडे (५ वर्ष) हिचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावरच शोध पथकाला सापडला असून नव्या इंद्रराज वाघाडे (७ वर्ष) हिचा शोध अजूनही सुरू आहे.