भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : प्रधानमंत्री घरकुल आवास योजना तसेच गावात विविध योजने अंतर्गत विकास कामे मंजूर असून रेती अभावी संपूर्ण कामे रखडलेली असल्याने त्वरित रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरपंच संघटनेतर्फे तहसीलदार सुरेश वाघचौरे मोहाडी यांना तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्र नागफासे, राजेश हटवार, गुलाब सव्वालाखे, सतीश ठवकर, दिगंबर सेलूकर, लोकेश रोटके, आत्माराम आतकरी, ईश्वर माटे, कैलास मते, शरद रोटके, वसुंधरा अतकरी, रेश्मा ईश्वरकर बेटाळा, रिता ठेंगे, पूजा ठोंबरे, नितेश बांडेबुचे यांनी दिलेल्या निवेदनातुन केली आहे. मोहाडी तालुक्यात वैनगंगा आणि सूर नदी सारख्या मोठ्या नद्या असताना सुद्धा पोलीस व महसूल विभागाच्या बेजबाबदार धोरणामुळे रेतीची फार मोठी टंचाई निर्माण झालेली असून अनेक बांधकामे रेती मिळत नसल्यामुळे बंद पडलेली आहेत. मोहाडी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसºया टप्प्या अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्या योजनेच्या अनुदानाचा पहिला टप्पा लाभार्थ्यांना प्राप्त झालेल्या आहे. त्यांना शासनाकडून काम सुरू करण्याच्या सूचना मिळालेल्या असून बांधकाम करण्याकरिता रेतीची अत्यंत आवश्यकता आहे.
रेती शिवाय बांधकाम होऊ शकत नाही. आपल्या तालुक्यात महसूल प्रशासनाने कुठेच रेती उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे घरकुलाचे बांधकाम रखडलेले आहे व लाभार्थ्यांचे फार नुकसान होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये अशांतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विविध योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये विकास कामे मंजूर असून ते विकास कामे सुद्धा रेतीच्या अभावामुळे ठप्प पडलेले आहेत व लवकरच विधानसभेच्या निवडणुकीचीआचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लक्षात घेता कोणतेही काम सुरू करता येणार नाही. गावात गटाराचे तसेच रस्ता नालीचे कामे अत्यंत आवश्यक असून सदर कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. सदर काम दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल प्रशासनाने सदर कामाकरिता प्राधान्याने रेती उपलब्ध करून देण्यात यावी या आशयाचे निवेदन सरपंच संघटना तालुका मोहाडी तर्फे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांना देण्यात आले.