माझी वसुंधरा अभियानात नागपूर विभागातून साकोली नगरपरिषदेने दुसरा क्रमांक पटकाविला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : राज्यात राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत नागपूर विभागातून साकोली नगरपरिषदेने दुसरा क्रमांक पटकाविला असून ५० लक्ष रुपयाचे पुरस्कार जाहीर झाले आहे. या अभियानात नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी शहरवासीयांचे सहकार्य प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली. प्राप्त केलेल्या उपलब्धीबद्दल सर्व स्तरावरून साकोली नगरपरिषद प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात माझी वसुंधरा अभियान ४.० हे १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. भूमी वायू जल आकाश अग्नी या पंच तत्वाच्या शीर्षकाखाली राज्य शासनाने सदर अभियान राबविले. यामध्ये साकोली नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली न.प. तील अधिकारी स्वप्निल हमने, कल्याणी भवरे, मिलन गजापुरे, धीरज राणे व कर्मचारी यांनी शहरवासीयांच्या सहकायार्ने वर्षभर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नागपूर विभागात द्वितीय स्थान पटकाविले आहे.

यामध्ये विदर्भ विभागात एक मात्र साकोली नगर परिषदेच्या वतीने पहिल्यांदाच शहरात दोन ठिकाणी इव्ही वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले. नगरपरिषद परिसरात एक चार्जिंग मशीन तर संत लहरी बाबा मठ परिसरात दुसरी मशीन लावण्यात आली यामध्ये नागरिकांना दोन चाकी तीन चाकी व चार चाकी इव्ही वाहनांची चार्जिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

एकल प्लास्टिक मुक्त साकोली या अभियानांतर्गत सिंगल युज कापडी पिशवी एटीएम मशीन हे सुद्धा विदर्भात पहिल्यांदाच साकोली नगर परिषदेने नागरिकांकरिता उपलब्ध करून दिली व प्लास्टिक मुक्त साकोली करून दाखविली. स्वच्छ व सुंदर शहर या दिशेने अभियान राबवून नागरिकांना ओला कचरा व सुखा कचरा संकलित करण्यासाठी प्लास्टिक कचरा बादली वितरित करण्यात आली. यामध्ये नागरिकांनी सहकार्य केले व घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी घरोघरी प्रचार व प्रसार करण्यात आला स्रोत विलगीकरणाच्या माध्यमातून ९७ % स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचारी व नागरिकांनी मोलाची भूमिका पार पाडली.

शहरातील अतिक्रमण मोडीस काढले व त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले नवीन हरित क्षेत्र विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून लाखांदूर चौक, एमबी पटेल कॉलेज रोडवर उद्यान उभारण्यात आले व आकर्षक सजावट करून शहरात नवीन हरित क्षेत्र विकसित करण्यात आला. शहरातील उड्डाणपूला खाली कॉलमवर वैशिष्ट्यपूर्ण, जनजागृती व प्रोत्साहित करणारे चित्र अधोरेखित करून शहराचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्थापनाकरिता शासकीय कार्यालयांना सूचना पत्र देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यामध्ये उपविभागीय व तहसील कार्यालय इमारत, पंचायत समिती भवन, आदिवासी मुलांचे वस्तीगृह आदिवासी मुलींचे वस्तीगृह व पोलीस स्टेशन इमारतीमध्ये रेन हार्वेस्टिंग व्यवस्थापन करण्यात आले. विद्युत पुरवठा बचत करण्याकरिता शहरात सोलर वर आधारित स्ट्रीट लाईट लावण्यात आले.

“नागपूर विभागातून साकोली नगर परिषदेला राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. ही उपलब्धी नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी तसेच साकोली शहरवासीयांच्या सहकार्याने प्राप्त झाली आहे. नगरपरिषदेने केलेले कार्य व सूचनांचे पालन करून साकोली शहरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केल्यानेच नागपूर विभागातून साकोली नगर परिषदेला द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहे. मिळणाºया पुरस्कार निधीतून शासनाने ठरविलेल्या निकषानुसार साकोली शहरात उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या पुरस्काराकरिता साकोली शहरवासी यांचे लाभलेले सहकार्य व नगरपरिषद कर्मचाºयांनी केलेल्या परिश्रमाबद्दल सर्वांचे आभार मानतो.”

मंगेश वासेकर मुख्याधिकारी नगरपरिषद साकोली

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *