भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा जवळील खैरबोडी येथे मुलाच्या हातुन आपल्याच दारूड्या वडीलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. मृतक याला दारूचे व्यसन होते.तो नेहमी त्याची बायको व मुलांची वाद घालुन भांडण करीत असे. २८ सप्टे रोजी नेहमीप्रमाणे त्याने वाद घातल्याने त्याची पत्नी घरून निघून गेली.दरम्यान मृतक याने रात्री मुलांना शिवीगाळ करून महारान केल्याने मुलाच्या हातून दारूडया वडीलाची हत्या घडल्याची खळबळजनक घटना घडली. तिरोडा पोलिसांनी आरोपी मुलास अटक केली आहे. खैरबोडी येथील रहिवासी मृतक रमेश पारधी ५० वर्ष याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी आपले पत्नी व मुलांशी भांडण करीत होता. दिनांक २८ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान रमेश पारधी याने दारू पिऊन पत्नीशी भांडण केल्याने पत्नी घरून निघून गेली व रमेशही निघून गेला.
रात्री साडे नऊ वाजता दरम्यान रमेश दारू पिऊन घरी आला असता त्याचा लहान मुलगा अंकुश घरी असल्याने त्याच्याशी वाद घालून परत बाहेर निघून गेला व रात्री साडेअकरा वाजता घरी परत आला व दोन्ही मुलांना तुमची आई कुठे गेली तुम्ही तिला लपवून ठेवले असेल असे म्हणत शिवीगाळ करून वाद घालुन मोठा मुलगा आनंद याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. वडील व मुलांमध्ये हाणामारी दरम्यान मोठा मुलगा आनंद त्याचे हातातील धातूचे कड्याने रमेश पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते खाली कोसळले. व त्याचे डोक्यातून व नाकातून रक्त वाहू लागले व काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय करडे, हवालदार योगेश कुळमते ,दीपक खांडेकर ,शिपाई शिवशंकर शेंडे, यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतकाचे प्रेत उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शवविच्छेदना करिता पाठविले. मृतकाचा लहान मुलगा अंकुश रमेश पारधी २२ वर्ष याचे फिर्यादी वरून तिरोडा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १०३ (१) नुसार गन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय करडे करीत आहे.