भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : बांधकाम पेटी योजनेअंतर्गत कामगार कार्यालयाच्या वतीने सुरू असलेल्या पेटी वाटपाचा कार्यक्रमात शेकडो महिलांची गर्दी उसळली व एकच गोंधळ उडाला. यावेळी महिला सैरावरा पळू लागला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत पाच ते सहा महिला गंभीर स्वरूपात जखमी झाल्याचे वृत्त आहे. भंडारा शहरातील अग्रेसन भवन मंगल कार्यालयात महिला कामगारांसाठी पेटी वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. पेटी घेण्यासाठी अचानक महिलांनी गर्दी केली. यात झालेल्या चेंगराचेंगरीत पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मागील काही दिवसांपासून पेटी मिळावी, यासाठी भंडाºयाच्या ग्रामीण भागातील महिलांनी भंडाºयात अर्ज भरला होता. दरम्यान, आज नागपूररायपूर राष्ट्रीय महामार्गावरील अग्रेसन भवन येथे पेटी वाटपाचा कार्यक्रम असल्याने अगदी मध्यरात्रीपासूनच भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला येथे उपस्थित झाल्या होत्या. अशातच, सायंकाळच्या सुमारास महिला पेटीसाठी धक्काबुक्की करून पुढे सरसावू लागल्या. या गदीर्ला पांगविण्यासाठी तेथे असलेल्या पोलिसाने महिलांना लाठी दाखवीत दमदाटी केली. त्यामुळे घाबरलेल्या महिला सैरभैर पळू लागल्या. त्यातच चेंगराचेंगरी होऊन काही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर आता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.