भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनीतर्फे गांधी जयंतीच्या निमित्ताने ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत ‘स्वच्छमेव जयते’ या विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय सेवा योजना ( ठरर ) आणि राष्ट्रीय छात्र सेना ( ठउउ) विभाग, तसेच सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक, आणि शिक्षकेतर कर्मचारी, या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. तालुक्यातील २५ गावांमध्ये एकाच वेळी राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे स्वच्छता आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश जनमानसात पोहोचवण्यात यश आले आहे. अभियानाची सुरुवात महाविद्यालय परिसरातील स्वच्छता करून करण्यातआली. त्यानंतर, सावरी, मुरमाडी, सोमलवाडा, खेडेपार, गोंडसावरी, गडेगाव, केसाळवाडा वाघ, रेंगेपार कोहळी, पिंपळगाव, मानेगाव, पोहरा, रेंगेपार कोठा, लाखोरी, सेलोटी यांसारख्या २५ गावांमध्ये स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
प्रत्येक गावात, गावकºयांचा, ग्रामपंचायत सदस्यांचा आणि स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग दिसून आला. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, मंदिर परिसर, शाळा आणि अन्य ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. धनंजय गिरहेपुजे, कॅप्टन बाळकृष्ण रामटेके, डॉ सुनंदा देशपांडे, प्रा संदीप सरय्या, प्रा रामभाऊ कोटांगले, डॉ धनंजय गभने, डॉ बंडू चौधरी, प्रा युवराज जांभूळकर, प्रा स्वाती नवले, प्रा रुपाली खेडीकर, प्रा लालचंद मेश्राम, सुरेश केदार, मनीषा मदनकर, प्रशांत वंजारी, रवी गुरूनानी, रितेश झलके, अजिंक्य भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत गावागावांत रॅली काढली. या रॅलीत, ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’, ‘स्वच्छता ही सेवा’,‘महात्मा गांधींचा संदेश स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे’ अशा घोषवाक्यांच्या घोषणा देत, ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी या अभियानाच्या यशस्वीतेबद्दल सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले. ‘हे अभियान केवळ एक उपक्रम नसून, गांधीजींच्या विचारांचा स्वीकार करण्याचा आणि स्वच्छ, निरोगी समाजाच्या उभारणीसाठी पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे ते म्हणाले. या अभियानाने लाखनी तालुक्यातील स्वच्छतेबाबत जनजागृती घडवून आणली आणि स्वच्छतेचे महत्त्व ग्रामीण भागात अधोरेखित केले. अभियानाचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. यापुढेही असे उपक्रम नियमित राबविण्याचा मानस महा- विद्यालयाने व्यक्त केला आहे.