भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कामगार कल्याण मंडळातर्फे साहित्य वाटप प्रक्रियेत कामगारांना होणारा त्रास लक्षात घेता प्रत्येक तालुका स्तरावर कामगार नोंदणी व साहित्याचे वाटप करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा कॉंग्रेसच्या पुजा बालु ठवकर यांनी दिला आहे. कामगार कल्याण मंडळामार्फत भंडारा जिल्ह्यात नोंदणीकृत कामगारांना मागील आठ दिवसापासुन किट व संसार उपयोगी साहित्याचे वाटप केले जात आहे. साहित्य घेण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यातील कामगार महिला-पुरूष वर्ग भंडारा येथे येत आहेत. सध्या सुरू असलेल्या कामगार साहित्य वाटप केंद्रावर रात्री ११ वाजेपासून कामगार तळ ठोकून बसतात. साहित्य वाटप केंद्रावर खाण्यापिण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने येथे कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चार दिवसापुर्वी भंडारा शहरातील अखिल सभागृह येथील साहित्य वाटप केंद्रावर चेंगराचेंगरी होऊन काही महीला कामगार जखमी झाल्या.गर्दी आटोक्यात येत नसल्याने पोलीसांनी कामगारांवर सौम्य लाठीहल्ला केला. अशा घटना व कामगारांचे होणारे हाल टाळण्यासाठी कामगार नोंदणी व साहित्याचे वाटप प्रत्येक तालुका स्तरावर करण्यात यावे अन्यथा पालकमंत्र्यांना घेराव करुन, काळे झेंडे दाखवुन, रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसच्या पुजा बालु ठवकर यांनी दिला आहे.