भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दक्षिणमध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने ‘संभाग स्तरीय लोककला महोत्सव’ दिनांक ३ आॅक्टोंबर आणि ४ आॅक्टोंबर २०२४ ला आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय स्तरावरील लोककला आता विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहेत. ज्या लोककला आपल्या मातीशी जुळलेल्या आहेत, या पाश्चिमात्य संगीतामध्ये आज त्या लोककलेचा स्वर हरवल्यागत दिसत आहे. दक्षिणमध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्यावतीने विभागीय स्तरावरील लोककलांचा ‘संभाग स्तरीय महोत्सवा’ मध्ये समावेश करण्यात आला. यामधे रेला लोक नृत्य, गोंडी ढोल नृत्य, गणगवळण, लावणी बतावणी, गोंधळ, पोवाडा, किर्तन, खडीगंमत, नकला, खापरी गोंडी इत्यादी अनेक लोककलांचा समावेश करण्यात आला.
याप्रसंगी सुशिल खांडेकर (संच प्रमुख) नालंदा लोककला मंच बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अति प्राचीन आणि विलुप्त होत असलेल्या गोंडी ढोल नृत्य आणि रेला लोकनृत्याचे नयन दिपक सादरीकरण करण्यात आले. सुशील खांडेकर, नालंदा लोककला मंच यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम भागात जाऊन तेथे कलावंतांना एकत्र करून त्यांच्याशी मातीशी आणि भावनेशी जुळलेल्या लोककलेला विभागीय स्तरावर सादर करून त्या लोककलेला तिची स्वत:ची ओळख मिळवून देण्याचे काठोकाठ प्रयत्न केलेले आहे.
सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून संभाग लोककला महोत्सवाचे आयोजन संपूर्ण देशामध्ये करण्यात आलेलं आहे. या दरम्यान अनेक कलावंतांनी या ठिकाणी आपल्या कला प्रदर्शित केल्या. यामध्ये विशिष्ट उल्लेखनीय गोष्ट अशी की, सिरोंचा, गडचिरोली, भामरागड, चामोर्शी अशा दुर्गम भागांमध्ये वास्तव्य करत असलेला १,२५,००० लोक समूह हा आदिवासी जनसमुह आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्या पैकी ११.२५% प्रमाण आदिवासी जनसमुदाय असल्याचे पहावयास मिळते. या भागात माडीया, गोंड, राजगोंड या जमाती पहावयास मिळतात. आणि प्रामुख्याने रेला, आणि गोंडी ढोल नृत्य पाहायला मिळते. ही लोक नृत्य कला आता लुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. खूप लोकांना ती लोककला पाहायला आवडते पण तिला प्रोत्साहन देऊन समोर करायला आवडत नाही. नालंदा लोक कला मंचच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील मातीशी जुळलेल्या निवडक कलावंतांचा एक समूह तयार करून सुशील खांडेकर संच प्रमुख नालंदा लोक कला मंच यांनी विभागीय स्तरावर गोंडी ढोल नृत्य आणि रेला लोकनृत्याचे सादरीकरण करून त्या लोककलेला तिची हक्काची जागा मिळवून देण्याचे अतुलनीय कार्य केलेल आहे.
याच लोककलेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचे नालंदा लोककला मंच चे स्वप्न आहे. प्रामुख्याने या ठिकाणी लोक कलावंत म्हणून बंदिश नगराळे, बेबिलता खांडेकर, उद्देश कामिडवार, प्रणय मेडपल्लीवार, महेश वाढई, दिव्या भोयर, सुनील भोयर, कल्याणी शेडमाके, नितीन भालाधरे, दुर्वास करकडे, मेघा करकडे, तन्वी घंटावार, गितिका खरवडे, मंगेश कन्नाके, खोमेश बोबाटे, अनुराग लाटेलवार, कृष्णाली पोटवी, सोनाली बोरकुटे, श्रद्धा कोडापे, मोनाली पोटावी, मानसी खोब्रागडे, रुपेश चौधरी आणि सौरभ गेडाम यांनी कलेचे उत्तम प्रदर्शन केले. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोबत असलेल्या नालंदा लोककला मंच च्या सर्व कलावंताच्या या अतुलनीय कार्याकरिता डॉ.अरुणकुमार डांगे, डॉ. आश्लेषा विनायक रोडगे, डॉ.सुचिता घडसिंग यांनी पुढील वाटचाली करीता सदिच्छा व्यक्त केल्या.