भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार भंडारागोंदिया जिल्ह्यातील इच्छुक विधानसभा निवडणूक उमेदवारांच्या मुलाखती आज साकोली येथे भंडारागोंदिया जिल्ह्याचे विधानसभा समन्वयक व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आल्या. या मुलाखती दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा क्षेत्राबद्दल क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी वर्तमान आमदार सहसराम कोरेटी यांच्या बद्दल नाराजीचा सूर व्यक्त करून कोरेटी हटाव काँग्रेस बचाव ची भावना व्यक्त केली. सर्व संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती सकाळी १० वाजता साकोली विश्रामगृहात घेण्यात आल्या. या मुलाखतीसाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर कार्यकर्त्यांना आशा आहे की विधानसभा निवडणुकीतही त्यांना त्याच प्रकारचे यश मिळेल, त्यामुळे त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.
साकोलीत १, तुमसरमध्ये ८ आणि भंडाºयात १३ संभाव्य उमेदवार
साकोली विधानसभा मतदारसंघासाठी आमदार नानाभाऊ पटोले यांच्याच एकमेव अर्जाची नोंद झाली. तुमसर विधानसभा मतदारसंघासाठी ८ संभाव्य उमेदवारांनी अर्ज भरले होते, ज्यामध्ये देवा इलमे, प्रमोद तितीरमारे, शिशुपाल पटले, राजेश हटवार, अनिल बावनकर, रमेश पारधी, खेमराज पंचबुद्धे, शंकर राऊत, विजय शहारे यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भंडारा विधानसभा मतदारसंघात १३ संभाव्य उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यामध्ये आनंदकुमार जगने, मनोज बागडे, सागर गणवीर, पृथ्वीराज तांडेकर, धनंजय तिरपुडे, विकास राऊत, राजकपूर राऊत, पूजा ठवकर, राजविलास गजभिये, अरविंद भालाधरे, युवराज वासनीक, डॉ. अतुल टेंभुणे यांचा समावेश होता.