एसटीची दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ आॅक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ असणार आहे. या भाडेवाढीमुळे महामंडळाच्या तिजोरीत सुमारे एक हजार कोटीचा महसूल जमा होईल. या भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास ७० ते १००० रुपयांनी महागणार आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी, पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आखतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतुन उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते. यंदा देखील २५ आॅक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाणार आहे. विठाई, शिवशाही, निमआराम बससाठी ही भाडेवाढ लागू असणार आहे. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीसाठी भाडेवाढ लागू असणार नाही. सध्या दिवसाला सुमारे २३ ते २४ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न महामंडळाला मिळते. हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पन्न ३० कोटी रुपये होईल, त्यामुळे महिनाभरात महामंडळाला ९५० ते एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल. सध्या महिन्याला ८५० कोटी रुपये महामंडळाला उत्पन्न मिळते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *