भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : आमच्या महायुती सरकारने शेतकरी सन्मान निधी, महिला सक्षमीकरणासाठी लाडली बहीण, युवक, जेष्ठ नागरिक, कामगार सहित समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत या योजना अविरत चालु राहणार असल्याचे प्रतिपादन खा.प्रफुल पटेल यांनी केले. लक्ष्मीरमा सभागृह, पवनी येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतांना खा.पटेल बोलत होते. यावेळी खा. श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माजी जिल्हा परिषद सभापती रेखा भुसारी व माजी जिल्हा परिषद सभापती नीलकंठ टेकाम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या भागातील शेतकरी हा विद्युत पंपाच्या सहाय्याने धान व अन्य पिके मोठ्या प्रमाणात घेत असतो.माझ्या शेतकरी बांधवांची व्यथा समजून घेत त्यांच्या कृषी पंपाचे विज बिल माफ तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून मदत करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.
शेतकºयांना मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा २५ हजार रुपये बोनस देण्याबाबत सरकारशी सकारात्मक चर्चा केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महिलांच्या बँक खात्यात पैसे येणे सुरु झाले आहे. मुलींना व्यावसायिक शिक्षणात निशुल्क प्रवेश, युवकांना युवा कार्य प्रशिक्षण च्या माध्यमातून पाठबळ देणे, बांधकाम कामगारांसाठी योजना अश्या अनेक योजना सरकारने अंमलात आणल्या आहेत. जन हिताच्या योजनाबाबत विरोधक भ्रम निर्माण करून सदर योजना बंद होणार असल्याचे सांगत लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्रया योजना बंद होणार नाहीत. या योजना अविरत सुरु ठेवण्यासाठी आगामी निवडणुकीत साथ द्या असे आवाहन खा.प्रफुल पटेल यांनी केले. यावेळी खा. प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, सरिता मदनकर, सुनंदा मुंडले, विजय सावरबांधे, हरीश तलमले, शैलेश मयूर, मुकेश बावनकर, लोकेश वैद्य व पदाधिकारी उपस्थित होते.