भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : जादूटोणा, भूत – भानामती, करणी, मंत्रतंत्र, चेटूक, चमत्कार, देवी अंगात येणे, जोतीष्य, बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत. या प्रकारांना अशिक्षितांप्रमाने सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात. यातून समाजात, गावागावात भांडणे निर्माण होवून एखाद्याचा बळी घेतला जातो. अश्या घटना होवू नयेत, यासाठी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, पटवारी यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. संबधित गावात ही मंडळी अप्रतिम असे समुपदेशन करून गावकºयांच्या डोक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करू शकतात. तर सहजतेने अंधश्रध्देचे निर्मूलन करता येईल.त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासा व घटनेची चिकित्सा करा, अंधश्रद्धा निर्मुलन हेच खरे राष्ट्रहित आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमसर तालुका संघटक, प्रसिद्ध वक्ते प्रा.राहुल डोंगरे यांनी केले.
तुमसर पोलीस ठाणेच्या वतीने व खापा सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने खापा येथे आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार – प्रसार समाज प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर घोडेस्वार होते. तर मंचावर प्रमुख अतिथी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तुमसर तालुका सचिव विजय केवट,सहसचिव किशोर बोंद्रे, सल्लागार राजू भाऊ चामट, माजी सरपंच राजकुमार माटे, पत्रकार नाना ठवकर, इंजि.रजत घोनमोळे उपस्थित होते. राहुल डोंगरे म्हणाले, शकुन व नवस, गंडेदोरे, ताईत, ग्रहांचे खडे, मंत्र तंत्र यांना सत्याचा आधार नाही. जोतीष्य, हस्तरेखाशास्त्र विज्ञान नाही. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. त्याचे निर्मूलन कसे करता येईल याकरिता प्रा.राहुल डोंगरे यांनी वैज्ञानिक प्रयोगातून अग्नी प्रज्वलित केले. कानाने चिट्टीवरील नावे वाचून दाखविले. जळते कापूर भक्षण करून दाखवले. निंबुतून केस काढून दाखविले. पेचकस द्वारे तांदुळ भरलेला तांबे वर उचलून दाखविले. वैज्ञानिक प्रयोगातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
जादुटोना विरोधी कायदा सुद्धा प्रा.राहुल डोंगरे यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितला. भंडारा जिल्ह्याचे आय.पी. एस. पोलीस अधिक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरिक्षक महादेव आचरेकर यांनी या उपक्रमाला चालना दिल्यामुळे अनेकांचे गैरसमज दूर होतील व कुणीही भोंदू बाबांना बळी पडणार नाही व गावा गावात शांतता प्रस्थापित होईल व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होवून आदर्श पिढी तयार होईल असे अपेक्षित आहे. यावेळी सौ. गिता माटे माजी जिल्हा परिषद सदस्य, सौ.ललिता रोकडे, सौ.काजल बिसने, सौ. पदमा वैद्य, सौ.निशा आगाशे, सौ.ममता ठवकर, आशिष रोकडे,राजेश डोंगरे, हवलदार मन्नाडे आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक किशोर बोंदरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार राजकुमार माटे यांनी केले. जिल्हा पोलीस विभागातर्फे राबवित असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन “प्रचार व प्रसार” कार्यक्रमाची नागरिकांकडून स्तुती केली जात आहे. महिला मंडळाने विशेष पुढाकार घेवून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कौतुकही केले जात आहे. हे विशेष!