भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमाविषयी माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २९ आॅक्टोबर हा असेल, तर ३० आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. दरम्यान, राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. तसंच महायुती आणि महाविकास आघाडी या नावांनीतयारी झालेल्या नव्या राजकीय समीकरणांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, याबाबत देशभरात उत्सुकता आहे.
राजीव कुमार यांनी प्रसार माध्यमांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘एक्झिट पोल दाखवताना सॅम्पल साइज काय होता, सर्वेक्षण कुठे केले गेले, निकाल कसे आले आणि निकाल जुळले नाहीत, तर जबाबदार कोण? याचा खुलासा व्हायला हवा. एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो आणि त्यांच्या अपेक्षा वाढतात. यामुळेच मतमोजणीनंतर निकालांबाबत मतदारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्या काही तासांत, नजुळणारा डेटा समोर येतो, जो मतदारांसाठी गोंधळात टाकणारा आहे. मतमोजणी मतदानानंतर सुमारे तीन दिवसांनी होते आणि त्याच दिवशी ६ वाजता निकालाविषयी अटकळ सुरू होते, परंतु ती कोणत्याही वैज्ञानिक आधारावर केली जात नाही. यावर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे उपाययोजना आहेत, ज्या माध्यमांनी स्वीकारण्याची वेळ नक्कीच आली आहे”, असेही ते म्हणाले. राजीव कुमार पुढे म्हणतात, “जेव्हा मतमोजणी सुरू होते, तेव्हा ८.०५- ८.१० च्या सुमारास निकाल (टीव्हीवर) येऊ लागतात. हे मूर्खपणाचे आहे. ईव्हीएमची पहिली मतमोजणी ८.३० वाजता सुरू होते. आम्ही ९.३० च्या सुमारास निकाल पोस्ट करणे सुरू करतो, त्यामुळे जेव्हा वास्तविक परिणाम येऊ लागतात, तेव्हा या विसंगतीमुळे काहीवेळा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.” यावेळी त्यांनी निवडणूक निकाल, एक्झिट पोलचे स्वरूप आणि त्याच्या परिणामावर गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे.