भंडारा विधानसभाक्षेत्रात इच्छुकांची संख्या वाढतीवर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विधानसभा निवडणुकीकरीता अद्यापही महायुती व महाविकास आघाडीतर्फे जागा वाटपाचा निर्णय झाला नसतांनाही भंडारा विधानसभा क्षेत्रात मात्र इच्छुकांनी जोरदार मोर्चेचांधणी सुरू केली आहे. तिकिट आपल्यालाच व मीच उमेदवार या तोºयात सध्या इच्छुक वावरतांना दिसतात. अद्यापही तिकिटाचा कुठेही ठावठिकाणा नसतांना इच्छुकांचा प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. विविध पक्षातील मोठे नेते, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणे सुरू आहे. तिकिट वाटपात महायुती आणि महाआघाडी दोन्ही बाजूला उमेदवारीवरून घमासान बघायला मिळत असून, इच्छुकांमध्ये देखील घालमेल दिसून येत आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी भंडारा विधानसभा क्षेत्रात प्रत्येक राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी प्रयत्न चालविले आहेत. त्याक रीता विविध क्लुप्त्या ही लढविल्या जात आहेत. काही इच्छुकांनी तर पक्ष आपल्यालाच तिकीट देईल, या आशेवर चर्चा बैठका घेणे, प्रत्येक गावात बॅनर, मोठ-मोठे होडींग्स लावणे, गावागावात नागरिकांच्या भेटीगाठी, खासगी, धार्मिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणे इत्यादी कामात स्वत:ला जुंपून घेतले आहे. विधानसभा निवडणूक्त पार पडल्यानंर २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येईल, अशी स्पष्टोक्ती निवडणूक आयोगाने दिली आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि महाय तीचे घटकपक्ष एकत्र लढणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. मात्र अद्यापही कोण कुठली जागा लढणार हे निश्चित न झाल्याने उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र इच्छुकांचा प्रचाराचा धडाका कायम आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर हे विजयी झाले असले तरी भाजपचे अरविंद भालाधरे यांनी चांगलीच लढत दिली. अरविंद भालाधरे यांना मिळालेले मताधिक्य व सध्या आ. नरेंद्र भोंडेकर यांच्याविषयी असलेली भाजपमध्ये नाराजी यामुळे भाजप भंडारा विधानसभा क्षेत्रावर दावा करीत असुन तसा ठरावही भंडारा तालुका भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामध्ये भंडारा विधानसभेची जागा भाजपला द्यावी अन्यथा भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते प्रचारापासुन अलिप्त राहतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे हा इशारा आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या विजयात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपतर्फे अनुप डोके, आशु गोंडाणे यांच्या नावाची जोरदार चर्चा असुन कैलाश तांडेकर, सुरेश अवसरे, नितीन तुमाणे, राजकुमार गजभिये हेसुध्दा इच्छुकांच्या रांगेत आहेत. विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मागील वेळी बंडखोरी करीत अपक्ष निवडणुक लढविली व ते विजयी झाले. नंतर त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीला समर्थन जाहिर केले होते, दरम्यान राज्यातील राजकारणात झालेल्या पक्षफुटीनंतर राज्यात सत्तांतर होवुन महायुतीचे सरकार आले. मतदार संघाचा विकास करायचा असल्यास सत्तेसोबत राहणे गरजेचे आहे हे ओळखुन अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी महायुती सरकारसोबत जाणे पसंत केले.

आ. भोंडेकर हे मागील अडीच वर्षापासुन सत्तेमध्ये असून त्यांनी मागील अडीच वर्षात हजारो कोटी रूपयांचा विकासनिधी आपल्या भंडारा विधानसभा मतदार संघात खेचून आणला आहे. त्यांनी काही महिन्याअगोदर भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केल्याने आ. भोंडेकर हेच महायुतीचे उमेदवार असतील असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान आ. भोंडेकर यांनी काही दिवसा अगोदर प्रसार माध्यमांमध्ये पक्षाने उमेदवारी दिली तर ठिक नाहीतर आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे सांगत एकप्रकारे महायुतीला इशारा दिला आहे. आ. भीडेकर हे मागील अनेक दिवसापासुन निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन विविध माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. महाविकास आघाडीमध्ये यंदा सिट वाटप करतांना मोठी डोकेदुखी दिसुन येत आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयात भंडारा विधानसभा क्षेत्राने काँग्रेस उमेदवा राला दिलेल्या निर्णायक विजयी मतांमुळे काँग्रेस पक्ष भंडारा विधानसभेवर आपलाच हक्क असल्याचे सांगत या जागेकरीता शड्डू ठोकून आहे.

भंडारा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडे असलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सरपंच पदाधिकारी व कार्यकर्ते यामुळे भंडारा विधानसभेची जागा काँग्रेसलाच मिळावी याकरीता कॉग्रेसचे पदाधिकारी कार्यकतें आग्रही आहेत. येथे काँग्रेसतर्फे पुजा बालु ठवकर, प्रेमसागर गणविर, धनंजय तिरपुडे, राजकपुर राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा असुन विकास राऊत, डॉ. अतुल टेंभुर्णे, युवराज वासनिक, राजविलास गजभिये, मनोज बागडे हेसुध्दा इच्छुक आहेत. काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या निरीक्षकांनी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये इच्छुकांचे मोठे शक्तिप्रदर्शन दिसुन आले. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सुध्दा भंडारा विधानसभा क्षेत्रावर दावा केला जात आहे. मागील काही दिवसात शिवसेना (उबाठा) चे वरिष्ठांनीसुध्दा भंडारा विधानसभा क्षेत्रात दौरा करीत परिस्थिती जाणून घेतली. यावेळी अनेकदा त्यांनी माध्यमांशी बोलतांना भंडारा विधानसभेची जागा ही पुर्वीसुध्दा शिवसेनेची होती आणि आतासुध्दा शिवसेना (उबाठा) ची असणार असा दावा केला आहे. भंडारा विधानसभा क्षेत्राकरीता शिवसेना (उबाठा) तर्फे नरेंद्र पहाडे हे प्रमुख दावेदार असल्याचे सध्यातरी दिसुन येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *