रमाकांत खोब्रागडे तिरोडा : नगरपरिषद तिरोडा अंतर्गत असलेले लोधीटोला येथील महिलांनी त्यांना महाराष्ट्र शासनाचे लाडकी बहीण योजनेतून मिळालेले रकमेतून शाळेत एका वर्गखोलीचे बांधकाम करण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेऊन त्याना लाडकी बहीण योजनेतून मिळालेली रक्कम शाळेचे व्यवस्थापन समितीकडे जमा केली आहे. तिरोडा लगत असलेले लोधीटोला येथे तिरोडा नगरपरिषदे अंतर्गत शहीद वीरांगणा राणी अवंती बाई सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा असून या शाळेत एक ते पाच वर्ग असले तरी वर्ग खोल्या मात्र चारच असल्याने एक वर्ग शाळेचे पटांगणात भरवण्यात येते. यामुळे या विद्यार्थ्यांना त्रास होत असून त्यांचे अध्यापनाचे कार्यात अडथळा निर्माण होत असल्याने या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे महिलांनी लोक वर्गणीतून एक वर्गखोली बांधण्याचा ठराव घेऊन १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मंडळींना आपला बेत सांगितला.
तसे याचवेळी महाराष्ट्र शासनाद्वारे लाडकी बहीण योजना जाहीर झाल्याने या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांनी आपण आपल्यालाला शासनाकडून मिळणारे पहिले दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये शाळेचे वर्गखोली बांधण्या करता देण्याचे ठरवल्याने त्यांच्या या चांगल्या उपक्रमाकरिता इतरही महिला व पुरुषांनी आम्हीही या चांगल्या कामाकरता हातभार लावू असे म्हणत या शाळेतील ४० महीला पालकांनी त्यांना मिळालेले प्रत्येकी ३ हजार रुपये व इतर दहा महिलांनी तसेच काही इतर पालकांनी दिलेले निधीतून आज तारखेपर्यंत १ लक्ष ७५ हजार रुपये गोळा झाले असून इतर महिला पुरुषानी ७५ हजार रुपये देण्याचे मंजूर केल्याने २ लक्ष ५० हजार रुपयांचे वर्गणीतून येथे एक वर्ग खोली बांधण्याचा निर्धार करण्यात आला असून लवकरच या कामाची सुरुवात करणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी चौधरी व शाळा व्यवस्थापन समितीच्या हेमलता विष्णुदास लिल्हारे यांनी दिली असून लाडकी बहीण योजनेचे रकमेतून अशा प्रकारचा हा महाराष्टÑ राज्यातील पहिलाच उपक्रम असण्याची शक्यता आहे.