भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोसे धरणाचे बॅक वॉटर तसेच नदीला येणाºया पुराच्या पाण्यामुळे त्रस्त असलेल्या पूरपीडित नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून लोकप्रतिनिधीनी मत मागायला येऊ नये, असा पूरग्रस्त कृती समितीने इशारा दिला आहे. गणेशपूर लगतच्या सत्कार नगर, नागपूर नाका परिसर,आंबेडकर वॉर्ड, नेहरू वॉर्ड तसेच इतर क्षेत्रात वारंवार येणाºया पुराने येथील दोनशेच्या जवळपास नागरिक त्रस्त असून कुटुंबाचे ऐच्छिक पुनर्वसन करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासन/ प्रशासनाला सातत्याने निवेदने दिले. मात्र अध्यापही पूराची समस्या सुटली नाही.
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांचे दि. १२ आॅक्टोबर २०२२ च्या पत्रानुसार २६ पुरबाधित गावाचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला असून यादीत गणेशपूरचा समावेश असल्याचे नमूद आहे. त्यामुळे गणेशपूर हद्दीतील पुरपीडित नागरिकांचे पुनर्वसन होण्याची पुरपीडिताना आशा होती. मात्र नव्याने जाहीर झालेल्या बाधित गावात २२ गावाचा समावेश असून यादीत गणेशपुरचे नावच नाही, हे विशेष. पावसाच्या हलक्या सरी पडल्या किंवा वैनगंगेच्या जलसाठ्यात वाढ झाल्यास आधी पुराचे पाणी घरात शिरून नागरिकांना घरे सोडावी लागतात. त्यामुळे हे क्षेत्र पुरबाधित नाही असे जाहीर करा किंवा बाधित असेल तर ऐच्छिक पुनर्वसन करावे. अन्यथा येत्या २० नोव्हेंबरला होणाºया विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा नागरिकांनी निर्णय घेतला असून कोणत्याही लोकप्रतिनिधीनी पूरबाधित क्षेत्रात मत मागण्यासाठी येऊ नये, असा इशारा दिला आहे.