आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा-अश्विनी मांजे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने साकोली विधानसभा क्षेत्रांत निवडणुकीचा महासंग्राम रंगत असून, राजकीय पक्षांच्या डावपेचाला प्रारंभ झाला आहे. प्रमुख पक्षातील उमेदवार कोण राहणार याकडे मतदारांची उत्सुकता लागली आहे. निवडणूक अधिकारी अश्विनी मांजे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रिया आणि आदर्श आचारसंहिता याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, निवडणुकीचे सुचारू आणि पारदर्शक आयोजन सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, साकोली तहसीलदार निलेश कदम,लाखनी तहसीलदार धनंजय देशमुख, लाखांदूर तहसीलदार वैभव पवार, ठाणेदार संजय गायकवाड उपस्थित होते. साकोली विधानसभा क्षेत्रात साकोली, लाखनी व लाखांदूर या तीन तालुक्याचा समावेश आहे. मतदान केंद्राची संख्या ३७९ असून या विधानसभा क्षेत्रात पुरुष १६३५९४ तर स्त्री १६३४०५ असे मिळून ३२६९९९ मतदारांची संख्या आहे. १८ ते १९ वयोगटातील ८६४५ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ८५ वर्षावरील मतदार २५६९ आहेत तर दिव्यांग मतदार ३१७२ आहेत. सखी मतदान केंद्राची संख्या ३, नव मतदार केंद्र ३ व दिव्यांग मतदार केंद्र १ स्थापित करण्यातयेणार आहे.

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू होताच विधानसभा क्षेत्रात लावलेले राजकीय तसेच उमेदवारांच्या संभावित प्रचारार्थ लावलेले होर्डिंग व बॅनर काढण्याच्या कारवाईला तात्काळ स्वरूपात प्रारंभ करण्यात आला. साकोली शहरात पालिकेच्या वतीने ही कारवाई सुरुवात करण्यात आली असून विधानसभेतील अन्य क्षेत्रातही ही कारवाई प्रारंभ झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रती उमेदवार खर्च मर्यादाही निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. यात प्रति उमेदवार ४० लाख रुपये एवढा खर्च निवडणुकीत करू शकतो. यात त्याला प्रत्येक बाबीचा निवडणूक खर्चनियमाप्रमाणे सादर करावयाचा आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहारास प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. प्रचारादरम्यान आचारसंहिता उल्लंघन झाल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. निवडणूक आयोगाने यासाठी एक स्वतंत्र निरीक्षक पथक तयार केले आहे, जे आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे. यावेळी मांजे यांनी मतदारांना निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करत मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *