बडोलेंचा धसका की विरोधकांची नवी खेळी?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी अर्जुनी मोर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आघाडी आणि युतीच्या उमेदवारीवरून मोठे घमासान पाहायला मिळत आहे. अजूनही कोणत्याही पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. मात्र भाजपच्या माजीमंत्री राजकुमार बडोले यांच्या वेगवेगळ्या पक्षात पक्षप्रवेशाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी राजकुमार बडोले यांच्या लोकप्रियतेचा धसका घेतला की विरोधकांची ही नवी खेळी आहे. याबाबत विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. माजीमंत्री राजकुमार बडोले यांनी २००९ मध्ये ६९८५६ मते घेत काँग्रेसच्या रामलाल राऊत यांचा १६३०७ मतांनी पराभव केला. २०१३ मध्ये मतांची टक्केवारी कमी झाली. मात्र प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार राजेश नंदागवळी यांचा ३०२९५ इतक्या भरघोस मतांनी पराभव केला. अन् राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. बडोले यांनी सामाजिक न्याय विभाग काय असते हे महाराष्टाला दाखवून दिले. मंत्रीपदाच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय तथा केलेली विकास कामे महाराष्ट्र कधीच विसरु शकणार नाही. मात्र २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्तमान आमदार चंद्रिकापुरे यांनी केवळ ७१८ मतांनी त्यांचा पराभव केला.

मात्र पराभूत झाल्यांनतरही त्यांनी मतदारसंघ सोडला नाही. सर्व सामान्यांसोबतची जी नाळ जुळलेली होती ती या पाच वर्षात टिकवून ठेवली. आता २०२४ विधानसभा निवडणूक रणसंग्राम सुरू झाला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी असलेल्या विरोधकांकडून आज वर्तमान परिस्थितीत मतदार संघातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेता जनसामान्यांमध्ये बडोलेंनी आपली बाजू उजवी केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मागील महिन्यातही राजकुमार बडोले हे तुतारी वाजवतील अशीही चर्चा सुरू करण्यात आली होती. त्यावर बडोलेंनी कायद्याचा वापर करत डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. आता परत एकदा बडोले घड्याळ हाती बांधणार असल्याची चर्चा काही न्यूज चॅनल्सच्या माध्यमातुन मतदारसंघात सुरू करण्यात आली. त्यामुळे ही चर्चा त्यांना तिकीट मिळू नये म्हणून स्वपक्षातील नेत्यांकडून त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आहे की, आघाडीच्या नेत्याकडून त्यांच्या जनमानसातील लोकप्रियते विरोधात सुनियोजित षडयंत्र आहे, अशी चर्चा विधानसभा मतदारसंघात सुरू झालेली आहे. यावर राजकुमार बडोले यांनी मी भाजपमध्येच आहे. मी इतर कुठल्याही पक्षांमध्ये प्रवेश करणार नाही. मी भाजपमधूनच लढणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण तापलं असून शेवटच्या क्षणाला कोण कुठल्या पक्षातून आणि कुठलं चिन्ह घेऊन निवडणूक लढणार हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात होणारी निवडणूक ही काट्याची ठरणार असून तिरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *