भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेश व ओरिसा राज्यात चोरी आणि बॅग लिफ्टिंग करणाºया टोळीतील तिघांना आमगाव पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केले. देवा नागय्या पिटला (४२), राजेश राजू पिटला (२०) व एक विधी संघर्ष बालक (१२) रा. नेल्लुर (आंध्रप्रदेश) असे आरोपींची नाव आहे. आमगाव पोलिस १७ आॅक्टोबर रोजी भंडारा कारागृहात एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आरोपी प्रविण अशोक डेकाटे (रा. मोहाडी) याला आमगाव पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणात सुपूर्द करण्यासाठी शासकीय वाहनातून आणत होते. दरम्यान नवेगावबांध रेल्वे फाटकाजवळ ३ आरोपी संशयास्पदरित्या दुचाकीने जात असल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र त्यांची दुचाकी रस्त्याखाली घसरल्याने त्यांनी पळ काढला. पोलिसांनी तिघांचा पाठलाग करुन त्यांना डुग्गीपार येथे तलावाजवळ ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान तिघांनी आमगाव पोलिस हद्दीत १ लाख ५ हजार रुपयांची चोरी, बिलासपूर जिल्ह्यातील तारबहार पोलिस ठाणे हद्दीत २ लाख ५ हजार रुपये, डोंगरगड पोलिस ठाणे हद्दीत २ लाख रुपये, जंजीर चंपा येथे १ लाख ५ रुपये, बालाघाट जिल्ह्यातील नवेगाव ग्रामिण पोलिस ठाणे हद्दीत ४.३५ लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलिस ठाणे हद्दीत ६ लाख ५ हजार रुपये, बिलासपूरजिल्ह्यातील कारभार पोलिस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी, भुवनेश्वर जिल्ह्यातील चंद्रपूर पोलिस ठाणे हद्दीत १ लाख ५ हजार रुपये केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून विधी संघर्ष बालकाला बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून दुचाकी, दुचाकी तोडण्याचे लोंखडी साहित्य, ३४,३०० रोख व एक मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी हे आंतरराज्यीय सक्रिय टोळीतील चोरटे असल्याने त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.