भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी येथील ओमॅट वेस्ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) या कंपनीमध्ये २० फुटावरून २०० किलो स्टील स्क्रॅप अंगावर पडल्याने एक कामगार (अजय रवींद्र राम, रा. बिहार) मागील रविवारी गंभीररित्या जखमी झाला. रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित केले. सदर कामगाराच्या कुटूंबियांना कुठलाही मोबदला न देता कंपनी व्यवस्थापनाने मृतदेह त्याच्या मूळगावी पाठवून दिला. मृत्यू झालेल्या कामगारास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व कंपनी व्यवस्थापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंपनीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ओमॅट वेस्ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) कंपनीमध्ये झालेल्या घटनेनंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट देऊन पाहणी केली असता अनेक गंभीर बाबी दिसून आल्या. सदर कंपनीचे स्ट्रक्चरल आॅडिट झालेले नाही. कंपनीत कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने नियमानुसार कोणत्याच सुविधा पुरविल्या जात नसून सेफ्टी आॅफिसर नाही. प्रदूषण मोठ्या प्रमाणात असून प्रदूषण नियंत्रणार्थ कुठल्याच उपाययोजना नाही. प्रदुषणामुळे कंपनी परिसरातील शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. कंपनीत स्थानिक कामगार कमी आणि परप्रांतीय कामगारच जास्त प्रमाणात घेण्यात आले आहे. या परप्रांतीय कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन न करता कामगारांची भरती करण्यात आली आहे.
या कामगारांकडून नियमानुसार ८ तासांऐवजी १२ तास काम करवून घेतले जाते. वेतनसुध्दा नियमानुसार दिले जात नाही. यासह अनेक बाबींमध्ये अनियमितता सदर कंपनीत सुरू असल्याचे आमदार अडबाले यांना आढळून आले. या कंपनीमध्ये आधीदेखील अनेक कामगारांचा कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेला आहे. यामुळे अजय रवींद्र राम या मयत कामगारास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व सदर कंपनीत व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या कामगारांच्या मृत्यूस कंपनी व्यवस्थापन सर्वस्वी जबाबदार असून या कंपनी व्यवस्थापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंपनीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात सदर कंपनीच्या अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित करून कामगार व शेतकºयांना न्याय मिळवून देणार असल्याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.