भंडारा पत्रिका /प्रतिनिधी तिरोडा : गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातून आठवडी बाजारातून मोटार सायकल चोरुन नंबर प्लेट बदलुन विक्री करणारे दोन आरोपींना गोंदिया गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेऊन तिरोडा पोलिसांची स्वाधीन केले आहे.
तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत वडेगाव, नवेझरी, मुंडीकोटा, येथून आठवडी बाजाराच्या दिवशी चोरी गेलेल्या मोटार सायकल यात २५ सप्टेंबर २०२४ रोजी मुंडीकोटा आठवडी बाजारात आलेले महादेव लील्हारे यांची मोटार सायकल क्रमांक एम एच ३५ व्ही १८९५, डॉक्टर मधुसूदन असाटी यांचे दवाखान्यासमोर ठेवून बाजार करण्यास गेले असता परत येऊन पाहिले असता त्यांची मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे लक्षात आल्यावरून तिरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला त्याचप्रमाणे ११ आॅक्टोबर २०२४ रोजी नवेझरी आठवडी बाजारातून कैलास चौधरी यांची मो.सा.क्र. एम.एच.३५ एसी ४९७२ ची चोरी केल्याची तक्रार दाखल झाल्याने या मोटार सायकल चोरीचा तपास तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, पोलीस निरीक्षक अमित वनखेडे यांचे मार्गदर्शनात तिरोडा गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तेजस कोंडे, हवालदार संजय बांदे, शिपाई सूर्यकांत खराबे, निलेश ठाकरे, महेंद्र अंबादे, तसेच याच गुन्ह्यासंबंधी समांतर तपास गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भांबरे व अप्पर पोलीस निरीक्षक नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनात गोंदिया गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे पथकातील प्रकाश गायधने, इंद्रजीत बसेल, दुर्गेश तिवारी, सुबोध भिसे, सुजित हलमारे, छगन विठुले हे करीत असता त्यांना मिळालेल्या गुप्त सूचनेवरून १९ आॅक्टोबर २०२४ रोजी यातील एक आरोपी तिरोडा येथे दिसून आल्याची माहिती मिळाल्याबद्दल गोंदिया गुन्हे शाखेचे पथकाने या आरोपीसह दुसºयाही आरोपीस ताब्यात घेऊन तिरोडा पोलीस स्टेशन येथे आणून विचारपूस केली.
चौकशी दरम्यान आरोपीने आपले नाव विकी वसंत रामटेके(२७), राहणार मंगळवारी पेठ उमरेड, विक्रम रामेश्वर उके, राहणार नारायण पेठ उंमरेड, असे सांगून आपण गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, मध्य प्रदेशातून मोटार सायकली चोरुन काही मोटारसायकली नंबर प्लेट बदलून विक्री केल्याचे सांगितल्यावरून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन तिरोडा पोलिसांचे स्वाधीन करून त्यांचे कडून तब्बल अठरा मोटरसायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.