सबके लिए खुला है मंदिर यह हमारा!
मतभेद को भूला है मंदिर यह हमारा!!
मानव का धर्म क्या है,मिलती है राह जिसमे!!
चाहत भला सभी का, मंदिर यह हमारा!!
तुकडोजी महाराज (पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे, (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला.आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे.तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते.आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती.समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल,याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती.त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली.
या उपाययोजनात्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.मानवतेचा संदेश देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ओजस्वी खंजिरी भजनातून हे संदेश सवार्साठी प्रेरणादायी होते. अशा या ब्रम्हलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्या पदस्पर्शाने भंडारा जिल्हा पावन झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भंडारा जिल्ह्यातील त्यांच्या वास्तव्याच्या काही आठवणी आजही जनमानसात आहेत. भंडारा जिल्ह्यात त्यांचे पहिल्यांदा १९३३ मध्ये आगमन झाले. शेकडो धार्मिक प्रचारक निर्माण करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रचारकांचा वर्ग आयोजित करण्यात येत होता. महाराजांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून १५ मे १९४४ ते ३० मे १९४४ पर्यंत धार्मिक प्रचारकांचा वर्ग घेण्यात आला.
या वर्गात पूर्व विदर्भ व छत्तीसगढ येथून सुमारे २०० प्रचारकांनी हजेरी लावली. या वर्गात स्वागतपद्धती, रामधून,धर्म आदी विषय अत्यंत सोप्या भाषेत गुरूदेवांनी समजावून सांगितले. लाखांदूर येथे जुलै १९४५ मध्ये धार्मिक सप्ताह समारंभाप्रसंगी तुकडोजी महाराजांच्या उपस्थितीत सामुदायिक प्रार्थना झाली. यावेळी सुमारे पाच हजारांवर स्त्री-पुरूषांची उपस्थिती होती. ३० नोव्हेंबर १९४५ ते २ डिसेंबर १९४५ पर्यंत महाराजांचा मुक्काम लाखांदुरात होता. ८ एप्रिल १९४८ लालाखांदूर येथील पाच दिवसांच्या जिल्हासंमेलनाच्या कार्यक्रमालाही त्यांची उपस्थिती होती.पवनी तालुक्यातील आमगांव (आदर्श) येथील सर्वांगीण शिक्षण वर्गाच्या निमित्ताने महाराज येथे उपस्थित होते. त्यानंतर येथे सेवाश्रम स्थापन केले. यासाठी रूक्मिणीबाई गोस्वामी यांनी ४५ एकर जमीन व घर दान केले होते. येथे सामुदायिक पद्धतीने पडीत जमिनीचा कायापालट केला. आंबाडा येथे महात्मा फुले वाचनालयाचे उद्घाटन केले. २४ ते ३० जानेवारी १९५३ मध्ये आदर्श आमगांव येथे महात्मा गांधी स्मृतिसप्ताह उत्साहात पार पडला. यातून आमगावाची आदर्श ओळख निर्माण झाली. १९५३ चा चार्तुमास वर्ग तुमसरला झाला. या वर्गात विदर्भ, मध्यप्रदेश,मध्यभारत, मुंबई आदी प्रदेशातून निवडक सेवाधिकारी व सेवक उपस्थित होते. या वर्गाला संत गाडगे महाराज, दादा धर्माधिकारी,आप्पाजी गांधी आदी मान्यवरांनी भेट देऊन मार्गदर्शन केले होते.
याच वर्गाच्या काळात महाराजांनी श्री ग्रामगीतेचे पहिले १३ अध्याय लिहिले. यावेळी तुमसरच्या प्रत्येक वॉर्डात सेवा समित्या स्थापन करून दुर्गंधी येत असलेला भाग स्वच्छ केला. २३ आॅक्टोंबर १९५३ ला चातुर्मास्य वगार्चा समारोप झाला.याला तुमसरचे सेठ दुर्गाप्रसाद सराफ यांनी खूप मदत केली.१९५४ चा चातुर्मास वर्ग भंडारा येथे पार पडला. राजे गणपतराव पांडे व बुटी यांच्या वाड्यात कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था होती. भंडारा येथील शेंदूर्णीकर, सेठ नटवरलाल, राजारामजी निर्वाण, हर्देनिया, परसोडकर, रंभाड आदींनी या वर्गाला मदत करून ते यशस्वी केले. ७ आॅक्टोंबर १९५४ ला विजयादशमीच्या मुहूर्तावर सीतारामदासजी महाराज, पाचलेगांवकर महाराज व दामोदर महाराजांच्या उपस्थितीत भव्य रामधून व शिस्तबध्द मिरवणूक निघाली. ८ आॅक्टोबर १९५४ ला भंडारा जिल्हासमाजसेवा परिषदेचे उद्घाटन चिंचबनात झाले. महाराजांच्या प्रवचनानंतर राज्यपाल डॉ. पट्टाभि सितारामैय्या यांचे प्रभावी भाषण झाले. भंडारा नगरात त्या दिवशी १० ठिकाणी सायंकाळी प्रार्थना झाल्या. २३ ते ३० नोव्हेंबर १९५४ पर्यंत भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूदानाकरिता दौरा व अनेक कार्यक्रम महाराजांनी संपन्न केले. दि.३० एप्रिल१९६० ला वंदनीय तुकडोजी महाराजांचा ५१ वा वाढदिवस भंडारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात करण्याचे राजारामजी निर्वाण यांनी ठरविले.मात्र, राष्ट्रसंतांना ते मान्य नव्हते.
यांनी माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा गावाचा वाढदिवस साजरा करा असे सांगितले. त्यानुसार राष्ट्रसंतांचा वाढदिवस ‘ग्रामजयंती’ उत्सवाच्या रूपाने साजरा करण्याचे ठरविले. यासाठी स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून गोंदियाचे प्रसिध्द उद्योगपती मनोहरभाई पटेल हे होते. त्यांच्या नेतृत्वात गोंदिया येथून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप भंडारा येथील शहीद मैदानावर अतिभव्य प्रमाणात झाला.यावेळी राष्ट्रसंतांसोबत राज्यपाल श्रीप्रकाश उपस्थित होते.तेव्हापासून ग्रामजयंती साजरी केली जाते.२२ मे १९६८ ला वैनगंगा नदीच्या काठावर वैनगंगा सभागृहाचे उद्घाटन व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा वंदनीय महाराजांच्या हस्ते करण्यात आली.अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाची स्थापना केल्यानंतर १९४६ मध्ये अण्णाजी महाराज यांचे गाव कान्हळगांव येथे राष्ट्रसंत कीर्तनाला आले होते. यावेळी राजारामजी (दादाजी) निर्वाण यांची भेट झाली. ते महाराजांच्या विचारांनी प्रभावित झाले. राजारामजी हे त्यावेळी भांड्याच्या दुकानात नोकरी करीत होते. महाराजांनी त्यांना स्व:ताचा व्यवसाय करण्याचे मार्गदर्शन केले. त्यानंतर दादाजींनी छोटेशे दुकान सुरू केले. अथक परिश्रमाचे फलित म्हणून व्यवसायात त्यांना यश आले.
राष्ट्रसंतांचे आशीर्वाद व परिश्रम यामुळे छोट्याशा व्यवसायाचे रूपांतर निर्वाण मेटल वर्क्स या पितळी भांड्यांच्या कारखान्यामध्ये झाले.या कारखान्याचे उद्घाटन राष्ट्रसंत महाराजांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रसंत यांचे भंडारा शहरात आगमन झाल्यानंतर ते नेहमी दादांकडेच मुक्कामाला असायचे. १९५४ च्या चातुर्मासाची धुरा दादांवर सोपविली होती. यामुळे दादांचे महाराजांशी संबंध अधिक दृढ झाले. दरम्यानच्या काळात दादांचे राहते घर कोसळले. या संकटाच्या घडीला राष्ट्रसंतांच्याशेकडो सेवकांनी श्रमदानातून घराची पुनर्बांधणी करून दिली. दादांची पत्नी सरस्वताबार्इंनी यांनी खांद्याला खांदा लावून मदत केली. मानवता आणि देशसेवेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खंजिरी भजनातून लोकांना प्रेरणा देत असत.अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कमळाच्या पदस्पर्शाने भंडारा जिल्हा पावन झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील त्यांच्या प्रवासातील अनेक आठवणी आजही अजरामर आहेत. समाजातील लोकांना राष्ट्रकायार्साठी प्रेरित करण्यासाठी ते अनेक कामे करत असत. भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चातुर्मास वर्ग होत असत व त्यात व्यक्तिश: हजर असायचे.
जिल्ह्यातील तुमसर, करडी, नरसिंह टेक- डी, पवनी, लाखांदूर, भंडारा आदी ठिकाणी त्यांनी चातुर्मास निमित्त प्रवचन दिले. बोलणे म्हणजे योग नाही, एकांत ठिकाणी साधना करा, अशा शब्दांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शिकवणीचा परिणाम करडी भागातील नरसिंह टेकडी येथे वास्तव्यास असलेल्या अण्णाजी महाराजांच्या मनावर झाला. या ओळींमधून त्यांनी एकाकीपणाची माहिती दिली होती. या राष्ट्रसंतांच्या सांगण्यावरून अण्णाजी महाराजांनी नरसिंह टेकडीवर वास्तव्य केले. राष्ट्रसंत आणि स्वामी सीतारामदास यांच्या आदेशानुसार वैनगंगा नदीच्या मध्यभागी ते वसले होते. तुमसर शहरात आयोजित चातुर्मास महोत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सहभागी झाले होते.
यानंतर ते अण्णाजी महाराजांना भेटण्यासाठी नरसिंह टेकडीवर आले. त्यांनी विविध आध्यात्मिक विषयांवर चर्चा केली. तुकडोजी महाराज अण्णाजींना म्हणाले, ‘आज आम्ही तुम्हाला एक विशेष आणि संपूर्ण माहिती देऊ इच्छितो की या टेकडीवर प्राचीन काळापासून गोस्वामी वंशातील एक सिद्ध पुरुष अदृश्यपणे राहत आहे. ”असे सांगून त्यांनी अण्णाजींना नरसिंग टेकडीचे महत्त्व सांगितले, काही काळ टेकडीवर राहून राष्ट्रसंत परतले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भंडारा जिल्ह्याच्या दौºयावर असताना अनेकदा करडी परिसरातून जात असत. दर दोन-तीन वर्षांनी ते आपल्या सेवकांसह या भागात येत असत. त्यांनी करडी गावातील तत्कालीन प्रतिष्ठित व्यक्ती स्व.तुळशीराम तानुसव कावळे यांच्या घरी विश्रांती घेत असत. त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था तिथेच असायची. त्यांच्या अनेक प्रवास वर्णनाच्या पुस्तकांमध्ये मोहाडी तालुक्यातील या भागातील निलज खुर्द, वैनगंगा नदी आणि करडी गावांचे वर्णन आहे. ग्रामीण विदर्भातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक भंडारा पत्रिकाच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विन्रम अभिवादन!