भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणूकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृष्णा खोपडे, मोहन मते व समीर मेघे यांना परत संधी देण्यात आली आहे. तर ‘लाडकी बहीण’च्या ‘जुगाड’ वक्तव्यामुळे चर्चेत आलेले टेकचंद सावरकर यांचे कामठीतील तिकीट कापण्यात आले असून तेथून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे निवडणूक लढविणार आहेत. रामटेक वगळता जिल्ह्यातील उर्वरित सहा जागांवर पक्षाकडून कोण लढणार हे गुलदस्त्यात असून इच्छुकांची धाकधूक आणखी वाढली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनच लढणार आहेत. तर विद्यमान आमदार कृष्णा खोपडे (नागपूर-पूर्व), मोहन मते (नागपूर-दक्षिण), समीर मेघे (हिंगणा) यांना परत उमेदवारी देण्यातआली आहे. कामठी येथून २०१९ साली नाट्यमयरित्या बावनकुळे यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली होती. त्यामुळे ते निवडणूक लढतील की नाही याबाबत साशंकता होती. मात्र केंद्रीय भाजपच्या सर्वेक्षणाच्या आधारावर बावनकुळे यांना कामठीतून लढण्याची सूचना करण्यात आली व त्यांचे नाव पहिल्या यादीतच जाहीरदेखील करण्यात आले.