भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : पवित्र पोर्टलद्वारे रुजू झालेल्या नवनियुक शिक्षकांचे सेवा प्रवेशत्तर प्रशिक्षण दिवाळी सुट्टीच्या कालावधीत घेण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात आले. मात्र अनेक शिक्षक परजिल्ह्यातील असून दिवाळीत स्वगावी जातील. त्यामुळे दिवाळी सुट्टयात प्रशिक्षण न घेता नंतर घेण्याच्या मागणीसाठी विदर्भ खाजगी प्राथ. तसेच माध्यमिक शिक्षक संघाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे यांना देण्यात आले. जिल्ह्यात पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था तसेंच खाजगी अनुदानित, प्राथमिक/माध्यमिक शाळेत शिक्षकांची भरती करण्यात आली. नव्याने लागलेल्या शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रमाअंतर्गत दि.४ ते १० नोव्हेंबर या कालावधीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. मात्र जिल्ह्यातील शाळांना दि. २६ आॅक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीच्या दीर्घ सुट्टया आहेत.
याशिवाय जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळेत रुजू झालेले बहुतांश शिक्षक बाहेर जिल्ह्यांतील असून त्यांना दिवाळी सणासाठी स्वगावी जायचे असल्याने दिवाळी सुट्टीत प्रशिक्षण घेतल्यास त्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण दिवाळीच्या दीर्घ सुट्टयात न घेता सुट्टीचा कालावधी संपल्यानंतर घेण्यात यावे. असे विदर्भ खाजगी प्राथमिक शिक्षक संघ तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघांने निवेदन दिले आहे. यावेळी दारासिंग चव्हाण, प्रभाकर मेश्राम, टिंकेश लांजेवार, रामरतन केवट, मनोजकुमार शेंडे, राजेश धुर्वे, सुधाकरदेशमुख, टेकचंद मारबते, धिरज बांते, जागेश्वर मेश्राम, शालिकराम खोब्रागडे, रामरतन केवट, भीष्म टेम्भूर्णे, गौतम खोब्रागडे, अनंत जायभाये, संजय लेनगुरे, जयदेव बोकडे, विलास खोब्रागडे, सुधाकर धाडसे इत्यादी उपस्थित होते.