भंडारा पत्रिका/वार्ताहर दिघोरी/मोठी : लाखांदूर तालुक्यात खरीप हंगामाच्या धानकापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. मंजुराच्या अभावामुळे बहुतांश शेतकरी हार्वेस्टर पसंती देत आहेत. वाढती मजुरी व मजुरांच्या टंचाईमुळे हार्वेस्टर हा पर्याय शेतकºयांकडे असून, कमी वेळात काम आटोपण्यासाठी हार्वेस्टरची मागणी वाढली आहे. लाखांदूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात २५ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड केली आहे. खरीप हंगामात विविध सिंचन सुविधांसह पावसाच्या पाण्याने लाखांदूर धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून, लाखांदूर तालुका हा धानाच्या कोठाराचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यातिल शेतकरी धान शेतीवर अवलंबून असतात. दरम्यान, लाखांदूर तालुक्यात गत ८ दिवसांपासून धान कापणीला व मळणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाच्या भीतीमुळे व मजुरांच्या टंचाईमुळे शेतकºयांनी यंदाच्या हंगामात हार्वेस्टरला पसंती दिली आहे. दरम्यान, गत काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी कर्जाच्या ओज्याखाली दबलेला आहे. नैसर्गिक दृष्टचक्राच्या कचाट्यात सापडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
या परिस्थितीत आशाळभूत नजरेने आकाशाकडे बघत भविष्याचे काय? आणि कसे? होणार या गर्तेत शेतकरी सापडला आहे. अशातच कापनीच्या वेळी बदलत्या वातावरणमुळे अवकाळी पावसासह धानपिकावर रोगराईचा प्रभाव वाढत आहे. ऐन कापनीच्या वेळेस तुळतुळ्याने धानपिकवर हल्ला चढविला आणि त्यामुळे शेतकºयांच्या तोंडाशी आलेल्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच अस्मानी संकटातून बाहेर पडलेल्या शेतकºयांवर मोठे संकट निर्माण होण्याची वेळ आली आहे. शिवाय धान पिकावरतुडतुड्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे तुळतुळा व अवकाळी पावसाच्या भीतीने शेतीशिवारातील कापणीस आलेले तर काही कापणीस येण्यापूर्वीच धानाची कापणी जोरात सुरुवात केली आहे. जलदगतीने शेतातील कामे आटोपून पुढील हंगामाला सज्ज होण्यासाठी शेतकरी कापणी सोबतच मळणी करणाºया हार्वेस्टरला पसंती देत कापणी व मळणी करत आहेत. तर अवकाळी पावसाने काही शेतशिवारात जमीन ओली असल्याने हारवेस्टर चिखलात फसत असल्याने मजुरांच्या साह्याने धानाची कापणी करीत आहेत.