भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : अवघ्या एक दिवसाच्या बाळाला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर घेतले जाते आणि पुढे तब्बल २५ दिवस त्याला कृत्रिमरित्या प्राणवायू पुरवठा केला जातो. चार आठवड्यानंतर या दिव्यातून बाळ सुखरूप बाहेर पडते आणि बाळासोबतच आई, वडील, नातलग व डॉक्टरांनीही मोकळा श्वास घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील युगंधरा आशिष भट ही प्रसुतीकरिता माहेरी वधेर्तील एका खाजगी रुग्णालयात भरती झाली. तिचे बाळंतपण सुखरूप होऊन तिने एका गोंडस व सुदृढ बाळाला जन्म दिला. मात्र, बाळंतपणाच्या दुसºया दिवशी पहाटे अचानक बाळाला धाप लागून त्याचे शरीर निळे पडू लागले. एक दिवसाच्या बाळाचे माहेरच्या आणि सासरच्या लोकांकडून गोडकौतुक होत असताना अचानक झालेल्या या बदलामुळे सर्व घाबरून गेले. प्रसुतीगृहातील डॉक्टरांनी तपासणी करून त्वरित सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सावंगी मेघे रुग्णालयात बाळाला नेण्यात आले. नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अर्जुन जयस्वाल यांनी बाळाची तपासणी करून त्याला नवजात शिशु अतिदक्षता विभागात भरती केले. बाळाला श्वास घेताना प्रचंड त्रास होत असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. त्यासोबतच अन्य तपासण्याही करण्यात आल्या. तपासणीअंति बाळाच्या संपूर्ण शरीरात, विशेषत: फुफ्फुसात जंतुसंसर्ग पसरल्याचे निदान झाले.
नवजात बाळाच्या प्रकृतीची नातेवाईकांना कल्पना देत डॉ. अर्जुन जयस्वाल व डॉ. सागर कारोटकार यांनी बालरुग्णांची पूर्ण निगा राखत औषधोपचार करण्यात आले. तब्बल २५ दिवसांच्या प्रयत्नांनंतर बाळाचे नैसर्गिकरित्या श्वास घेणे सुरू झाले आणि त्याला कृत्रिम श्वसन यंत्रणेतून बाहेर काढण्यात आले. सावंगी रुग्णालयातील सुमारे दीड महिन्याच्या मुक्कामानंतर बाळ आता आजोळी परतले. बाळाचे संपूर्ण उपचार शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात आल्याने पालकांना विनामूल्य ही सुविधा प्राप्त झाली असल्याचे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी सांगितले.