भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : पंचायत समिती तिरोडा परिसरात असलेले एकात्मिक बाल विकास प्रकल्पा समोर मागील चार महिन्यापासून पाणी वाहत असून याकरता जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अधिकारी यांनी पंचायत समिती तिरोडाचे शाखा अभियंता यांना महिना भरापूर्वी फुटलेले पाईप दुरुस्त करून पाणी बंद करण्याकरता उपाययोजना करण्याचे सांगूनही अजून पर्यंत हे वाहणारे पाणी बंद करण्याकरता कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही.
पंचायत समिती तिरोडाचे परिसरात एकात्मिक महिला बाल विकास प्रकल्पाचे कार्यालय असून या कार्यालयाचे वर बसवलेले पाण्याचे टाकीचे पाईप मागील चार-पाच महिन्यापूर्वी फुटले असून या फुटलेल्या पाईप मधून संपूर्ण स्लॅप वर व कार्यालयाचे समोर सतत पाणी वाहत असल्याने या कार्यालयात आपले कामाकरता येणाºया पर्यवेक्षिका, महिला, कर्मचारी यांना या पाण्यातून जाणे येणे करावे लागते ज्यामुळे एखाद पर्यवेक्षिका कर्मचारी किंवा कामाकरता येणाºया महिलांचा पाय घसरून पाण्यात पडून इजा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रकल्प कार्यालयातर्फे अनेकदा याबाबत शाखा अभियंता यांना पाईप दुरुस्त करण्याविषयी सांगितले तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता राहूल टेंभुर्णे यांनी देखील फोनवरून पंचायत समितीचे शाखा अभियंता गायधने यांना महिनाभराआधी त्वरित फुटलेले पाईप दुरुस्त करून या कार्यालया समोरुन वाहणारे पाणी बंद करण्याचे सांगितले असले तरी शाखा अभियंताकडून योग्य ती कार्यवाही न केल्याने या कार्यालयासमोरून सतत पाणी वाहत असून एखाद्या वेळी कोणी तरी पडून जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.