भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : महाविकास आघाडी कडून तुमसर विधानसभेच्या निवडणुकीत सह विचाराने एक उमेदवार निवडला जाणार आहे. त्याच्या निर्वाडा ३ नोव्हेंबर २०२४ ला होणार आहे. २८ आॅक्टोबरला किमान सहासात उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले जातील असा निर्णय महाविकास आघाडीतील बंड केलेल्या नेत्यांनी मोहाडी येथे घेतला आहे. निवडणुकीच्या अगदी तोंडावर अनेक पक्ष बदलणाºया नेत्याला ऐनवेळी पक्षात प्रवेश देण्यात आला. त्या नेत्यांची उमेदवारी निश्चित केल्या गेली. त्यामुळे संतप्त झालेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी बंड केला. संतप्त झालेल्या नेत्यांनी एकत्र येऊन एकीची मूठ तयार केली. महाविकास आघाडी कडून प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मोहाडी येथील प्रसिद्ध जागृत देवी माता चोंडेश्वरीच्या मंदिरात येऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पूजा अर्चा करून देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष किरण अतकरी, काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी, काँग्रेसचे मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार, जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, काँग्रेसचे प्रमोद तीतीरमारे, अमर रगडे, ठाकरचंद मुंगूसमारे, डॉ. पंकज कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ फेंडर, अनिता गजभिये आदी नेत्यांसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडणुकीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. झालेल्या सभेत, नेत्यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले, बारा नेत्यांपैकी सहमतीने उमेदवार ठरविला जाईल तो सगळ्यांना मान्य असेल. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात सामान्य जनतेची भावना लक्षात घेता उमेदवार ठरविला जाईल. उमेदवार ठरेल त्या उमेदवारासाठी तन, मन, धन सर्व काम करू अशी शपथ नेत्यांनी घेतली. महाविकास आघाडीचे अस्तित्वासाठी लढाई व आमचाहा बंड आहे. एक नेता सूड घेणारा तर दुसरा धनशक्ती असलेल्या उमेदवारांपुढे आपली लढाई आहे. या लढाईत आपण नक्कीच जिंकणार आहोत. असा विश्वास नेत्यांनी सभेत व्यक्त केला. आतापर्यंत जशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली तशीच एकजूट पुढेही निवडणुकीत दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तुमसर – मोहाडी विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे. धनशक्तीच्या पुढे कोणीही आमिषाला बळी पडू नका. एकी राहिली तरच निवडणूक जिंकता येईल. वरिष्ठ नेत्यांच्या दबाव आल्यावर पळून जाऊ नका अशी खंबीर भूमिका सर्व नेत्यांनी घेतली पाहिजे असेही मत व्यक्त करण्यात आले.