गोंदिया : जिल्हा पोलिस दल आणि सी ६० पोलिस दलाने राबविलेल्या संयुक्त कारवाईदरम्यान नक्षल्यांनी दगडांमध्ये लपवून ठेवलेला स्फोटकांचा साठा सर्च आॅपरेशनदरम्यान जप्त केला. ही कारवाई सालेकसा तालुक्याच्या छत्तीसगड सीमेवरील टाकेझरी जंगलात गुरुवार, २४ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागातील नक्षल हालचाली लक्षात घेता महाराष्ट्र सीमेलगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्य सीमा भागातील क्षेत्रात पोलिसांची सातत्याने गस्त आणि सर्च आॅपरेशन सुरू आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नक्षल गतीविधींवर आळा, प्रतिबंध घालण्याकरिता जिल्ह्यात कार्यरत सी ६० पथके, सशस्त्र दूरक्षेत्र, नक्षल प्रभावित भागातील पोलिस ठाण्यांतील अधिकाºयांना प्रभावीपणे जंगल अभियान, सर्च पेट्रोलिंग करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सालेकसा पोलिस ठाण्याचे बीडीडीएस पथक, श्वान पथकातील श्वान कॅण्डी, आॅपरेशन सेलचा स्टाफ रवाना झाले.
सीमावर्ती भागातील टाकेझरी जंगल परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग पथकाला गोपनीय माहिती मिळाली. टाकेझरी जंगल परिसरातील पहाडावरील दगडांमध्ये आक्षेपार्ह साहित्य लपवून ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. माहितीनुसार पाहणी केली असता पहाडावरील दगडांमध्ये एका पारदर्शी प्लास्टिक पॉलिथिनच्या तुकड्यामध्ये आक्षेपार्ह साहित्य मिळाले. त्यात इलेक्ट्रक वायर ४ बंडल, लाल रंगाचे कॉर्डेक्स १८ फूट, पांढरे युरियासारखे दाणेदार पदार्थ २ किलो, गडद हिरव्या व सिल्वर रंगाचे सेमीसॉलिड डिझेलसारखा वास येणारा पदार्थ, १२ व्होल्ट बॅटरी, ५ लीटर क्षमतेचा अॅल्युमिनिअम कुकर, जिलेटिनच्या तीन कांड्या, तीन प्लग, इलेक्ट्रिक डेटोनेटरसदृश वस्तू, पॅकिंग टेप दोन नग, अंदाजे ५ ते ७ सेमी लांबीचे लहान-मोठे एकूण ५२ नग लोखंडी खिळे, अंदाजे अर्धा ते ४ सेमी आकाराचे धारदार व नोकदार लहानमोठे एकूण ७८ नग लोखंडाचे तुकडे, जाड काचेचे धारदार व नोकदार ओबडधोबड आकाराचे एकूण १९० नग लहानमोठे तुकडे असे साहित्य आढळून आले. निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे.