भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : देशातील वेगवेगळ्या भागात मागील काही दिवसांमध्ये विविध यंत्रणांना सातत्याने विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळत आहे. त्यामुळे एकीकडे नागरिकांमध्ये भिती असून दुसरीकडे देशातील विविध सुरक्षा यंत्रणांचीही तारांबळ उडत आहे. दरम्यान नागपूर पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात या घटनेमागे गोंदिया कनेक्शन असल्याचे पुढे येत आहे. जगदीश उईके (३५) असे गोंदिया येथील या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव आहे. नागपूर पोलिस खात्यातील सूत्रानुसार, देशभरात विमानांना उडविण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी एका संशयित तरुणाची ओळख पटवण्यात यश मिळवले आहे. गोंदिया येथील ३५ वर्षीय जगदीश उईकेने हे कृत्य केल्याचा नागपूर पोलिसांना संशय आहे. आरोपी जगदीश उईके याला यापूर्वी २०११ मध्ये दहशतवादावरील एका लेखाच्या प्रकरणातही अटक करण्यात आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर पोलिसांच्या तपासात संशयित आरोपी जगदीश उईकेने बरेच ईमेल देशाचे पंतप्रधान कार्यालय, रेल्वे मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री, विमानसेवा कार्यालये, पोलीस महासंचालक आणि रेल्वे सुरक्षा दलासह विविध सरकारी कार्यालयांना पाठवल्याचा संशय आहे. २१ आॅक्टोबर रोजी उईके यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही या पद्धतीचे धमकी देणारे ईमेल पाठवले होते. त्यानंतर देशातीलकाही महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. उईके यांनी दिलेल्या इतरही वेगवेगळ्या धमकीनंतर नागपूर पोलिसांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेरही सुरक्षा वाढवली आहे. उईके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ‘गुप्त दहशतवादी संहिता’ वर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. नागपुरातील पोलीस विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, हा ईमेल पाठविण्याचा संशयित आरोपी जगदीश उईके सध्या फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. पथकाकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.