भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा पवनी विधानसभा मतदासंघातुन अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी आज त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.तत्पुर्वी शहरातील जलाराम मंगल कार्यालयात एकत्रित आलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना व समर्थकांना मार्गदर्शन करतांना नरेंद्र पहाडे यांनी ‘मी तर जनतेचा उमेदवार असल्याने नक्कीच जनता आपल्या पाठीशी उभी राहणार’ असा विश्वास व्यक्त केला. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची हि लढाई असून भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातील सुजाण मतदार नागरिकांनी मला आशीर्वाद द्यावे असे प्रतिपादन नरेंद्र पहाडे यांनी सभेला संबोधित करून मतदार राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो असे आवाहन केले आहे. यावेळी जलाराम मंगल कार्यालयातुन हजारो समर्थकांच्या उपस्थितीत नामांकन रॅली काढण्यात आली.सदर रॅली गांधी चौक,पोस्ट आॅफीस चौक,मोठा बाजार,त्रिमुर्ती चौक या मार्गाने निघाली. याप्रसंगी भंडारा पवनी तालुक्यातील सर्व समाजाचे नेते, पदाधिकारी ,कार्यकर्ते, सर्व सामान्य जनता तसेच हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.