भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी :- नजीकच्या सिपेवाडा गावालगत शेतशिवारात सोमवारी (ता. ४ ) पहाटेपासून २ पट्टेदार वाघ आल्याने सकाळपासून बघ्यांची गर्दी जमली असून वनविभाग, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत. २ पट्टेदार वाघापैकी १ वाघ शेतशिवारात ओढ्याकडे निघून गेला तर १ शेत शिवारालगत असलेल्या झुडपात दिवसभर बस्तान मांडले होते. त्याला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलीस व वन कर्मचा?्यांना पाचारण करण्यात आले वन अधिकारी व कर्मचा?्यांच्या प्रयत्नाने सायंकाळ च्या सुमारास झुडपात असलेला वाघ जंगलव्याप्त परिसरात निघून गेला. त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला असला तरी परिसरात वाघाची दहशत पसरली असल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. लाखनी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिपेवाडा येथे सोमवारी (ता. ४) पहाटेपासून २ पट्टेदार वाघ असल्याचे पशुपालकांना दिसले. पट्टेदार वाघ असल्याची माहिती गावासह पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे सकाळपासून बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. तर सकाळपासून गावात वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते .
सायंकाळ च्या सुमारास त्या वाघाला जंगलव्याप्त परिसरात पाठविण्यात वनविभागाला यश आले असले तरीही परिसरात वाघाची दहशत कायम आहे. घटनास्थळी उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे , लाखनी वनपरीक्षेत्र अधिकारी सुरज गोखले, मोबाइल पथकाचे वनपरीक्षेत्र अधिकारी उज्ज्वला बागडे, अड्याळ वनपरीक्षेत्र अधिकारी ऐवतकर, क्षेत्रसहाय्यक जितेंद्र बघेले, दीपक रंगारी, मुकेश शामकुवर तसेच ३०-४० वनकर्मचारी उपस्थित होते. तर पोलीस विभागातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने, पोलीस उपनिरीक्षक अशोक बोडे, पोलीस नायक राजेश बांते, पोलीस शिपाई सुनील मेश्राम, चालक पोलीस हवालदार मंगेश चाचेरे उपस्थित होते. वाघाने कुणालाही इजा पोहचवली नसली तरीही परिसरात वाघाची दहशत कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरकाबोडी शिवारात १ वाघीण आपल्या २ बछड्यांसह परिसरात भ्रमंती करीत होती. त्यातीलच हे २ बछडे असल्याची विश्वसनीय माहिती आहे.