भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी गोंदिया : राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदार संघातून आज ४ नोव्हेंबर रोजी नामांकन मागे घेण्याच्या दिवशी ३९ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. आता चार विधानसभा मतदार संघासाठी ६४ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असल्याने येणारी निवडणूक चुरसीचे होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, आमगावदेवरी, अर्जुनी मोरगाव व गोंदिया या विधानसभा मतदार संघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २४ आॅक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रकियेला सुरवात झाली. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष व बंडखोरांनी उमेदवारी अर्ज २९ आॅक्टोबर या कालावधीत सादर केले.३० आॅक्टोबर रोजी छाणीत १३४ नामनिर्देशनपत्र वैध तर १९ अवैध ठरले आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
आज अर्जनी मोरगाव मतदारसंघातून १६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने आता १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तिरोडा मतदार संघातून ६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने आता २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गोंदिया मतदार संघातून १३ उमेदवारांनी माघार घेल्याने १५ उमेदवारांमध्ये निवडणूक सामना पहायला मिळेल. तर आमगाव-देवरी विधानसभेत ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने येथे ९ उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे. अर्ज दाखल करताना राजकीय पक्ष व अपक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. प्रमुख राजकीय पक्षांच्या अनेक उमेदवारांनी नामांकन दाखल केल्याने बंडखोरी पहायला मिळाली. आता पुढाºयांनी अनेकांची मनधरणी करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले असले तरी ते प्रामाणिकपणे पक्षाच्या उमेदवारासाठी मत मागतील का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.