विधानसभा निवडणुकीत कोणाच्या मागे कार्यकर्त्यांचा घोळका जमणार?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नेता कितीही मोठा असला तरी, त्याची खरी शक्ती ही त्यांच्या कार्यकर्त्यावरूनच ठरवली जाते. मात्र, प्रत्येक कार्यकर्ता हा लहानलहान सुतळ्यांप्रमाणे विखुरलेला असतो. आपल्या मराठमोळ्या भागतही सामान्य व्यक्तीला ‘अरे सुतळीच्या’ असे संबोधले जाते. आता उमेदवारी अर्ज भरले आहेत. दोन दिवसांत कोणाच्या मागे कार्यकर्त्यांचा घोळका जमणार? यावरूनच समोरचा सुतळी बॉम्ब कोण, हे ठरणार आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली या तीन मतदानसंघात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. तुमसर येथे महायुती व महाविकास आघाडीकडून आजी आमदार राजू कारेमोरे व माजी आमदार चरण वाघमारे समोरासमोर उभे ठाकले आहेत. तसेच असंतुष्ट असलेल्या काही तुमसरवासींनी तिसरी आघाडी तयार केली. त्यातून चार जणांनी अर्ज भरले आहेत. रविवारी त्यापैकी कोण राहाणार, यावर शिक्कामोर्तब करण्याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोणीही उमेदवार राहिला तरी, त्यामागे मधुकर कुकडे यांचाच मोठा हात राहाणार आहे.

कदाचित तेच स्वत: या तिसºया आघाडीचे उमेदवार राहू शकतात. वयाची ७२ वर्षे पूर्ण करून तरूणांनाही लाजवेल इतकी शक्ती गोळा करणारे मधुभाऊ मैदानात आले तर, आजी व माजी आमदारांना काट्याची टक्कर देतील, यात शंका नाही. भंडारा विधानसभा क्षेत्रातून विद्यमान आमदार नरेंद्र्र भोंडेकर यांनी मोठे विकास कामे केली आहेत. तसेच येथे काँग्रेसकडून पूजा ठवकर यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी दिली आहे. तसेच शिवसेना (उबाठा) गटाचे नरेंद्र्र पहाडे यांनी बंडखोरी करत ते मैदानात असल्याचे दाखवले.

साकोली विधानसभा क्षेत्रात यावेळी काँग्रेसची तोफ झालेले नाना पटोले यांची ताकद पूर्वपिक्षा बरीच वाढलेली असून त्यांचा तिन्ही तालुक्यातील जातीजातींमधील मतदारांत मोठा पगडा बसलेला आहे. त्यांचा सामना करण्यासाठी उमेदवार शोधण्यात भाजपची मोठी दमझाक झाली. शेवटी राकाँ (अजितदादा) गटाचे अविनाश ब्राह्मणकर यांना ओढून आणून उमेदवार बनविण्यात आले. मात्र, आता जुन्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वत: भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले प्रकाश बाळबुद्धे, माजी आमदार बाळा काशिवार, डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी बडखोरी करत नामनिर्देशन अर्ज भरले आहेत. या सगळ्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते कोणाकडे जाणार? हेअधिक महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडी असो किंवा महायुती यातील सर्वांचीच शक्ती कार्यकर्त्याशिवाय काहीच नाही, याची माहिती सर्वच पक्षातील लहानमोठ्या सगळ्यांना चांगलेच ठाऊक आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *