भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा/पुलगाव : ट्रकद्बारे गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच समुद्रपूर, सेवाग्राम आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकचा पाठलाग केला. मात्र, समृद्धी मार्गावर नाकाबंदी केली असता ट्रक चालकाने पोलिसांच्या दोन्ही वाहनांना उडवून विरुळ आकाजी परिसरात ट्रक उभा केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी चालकाने जनावरं भरलेला ट्रक जाळून ट्रकमधील तिघेही फरार झाले. ही थरारक घटना रविवार ३ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी ट्रकमधील १५ जनावरांचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. मात्र, यातील १२ ते १५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. अवैध कत्तलीसाठी एम. एच.४०- सी. डी. ०२६६ क्रमांकाच्या ट्रकने उमरेड-सिर्सी मार्गे गोवंश कोंबून नेत असल्याची माहिती बेला पोलिसांनी समुद्रपूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा यासह जिल्ह्यातील सर्व पोलिसांना माहिती दिली. त्या आधारे समुद्रपूर, सेवाग्राम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ट्रकचा पाठलाग केला. ट्रकला अडविण्यासाठी समृद्धी महामार्गावर नाकाबंदी केली. येळाकेळीच्या इंटरचेंजवर नाकाबंदीसाठी उभ्या असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सेवाग्राम पोलिसांच्या दोन्ही वाहनांना धडक दिली. या धडकेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्यासह दोन पोलिस कर्मचारी थोडक्यात बचावले. त्यानंतर ट्रक चालकाने विरुळ आकाजी परिसरात ट्रक थांबविला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी जनावरे भरलेला ट्रक पेटवून दिला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ट्रकमध्ये अडकलेल्या १५ जनावरांची सुरक्षित सुटका पण, त्यामधील १२ ते १५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. ट्रक पेटविल्यानंतर चालकासह अन्य दोघे असे तिघेही फरार झाले.