उल्हास तिरपुडे /भंडारा पत्रिका भंडारा : वैनगंगा नदीला वारंवार येणाºया पुराने हतबल झालेल्या दोनशेच्यावर पूरपिडीत कुटुंबातील सदस्यांनी भंडारा विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून कोणत्याही उमेदवाराला मतदान करणार नसल्याचा पूरग्रस्त समितीने निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोनशे कुटुंबातील किमान हजार मतांचा फटका कोणाला बसणार काय याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. गोसे धरणाचे बॅक वॉटर तसेच नदीला येणाºया पुराच्या पाण्यामुळे त्रस्त असलेल्या पूरपीडित नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून लोकप्रतिनिधीनी मत मागायला येऊ नये, असा पूरग्रस्त कृती समितीने यापूर्वीच इशारा दिला आहे. मात्र निवडणूक जवळ येत असतांना देखील गणेशपूर लगतच्या सत्कार नगर, नागपूर नाका परिसर, आंबेडकर वॉर्ड, नेहरू वॉर्ड तसेच इतर क्षेत्रात वारंवार येणाºया पुराने त्रस्त असणाºया कुटुंबाचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याच्या बाबतीत प्रशासनाने कोणतीही सकारात्मक कार्यवाही केली नाही.
तसेच लोकप्रतिनिधीही पूरग्रस्त कुटुंबाच्या पुनर्वसन मागणीकडे पाठपुरावा करुनसुध्दा त्यांना यश आले नसल्याचे चित्रण असले तरीसुध्दा त्यामुळे वारंवार मतदान करूनही सामान्य जनतेच्या समस्याकडे समाधान होत नसल्याने मत का द्यावे?, असा नागरिकांनी सवाल केला असून मतदान न करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. सध्या भंडारा विधानसभा क्षेत्रात राजकीय पक्षाचे गट पडले असून आपापसात एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. याशिवाय पक्षातून निवडणुक लढाविण्यास इच्छुक असणाºयांनी बंडखोरी करून आपल्याच पक्षाला आव्हान दिले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होणार असून उमेदवारांना एकेका मतांची गरज आहे. अशावेळी हजार मतांच्या बहिष्काराने कोणाला फटका बसणार व कोणाचे गणित बिघडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.