नाजीम पाश्शाभाई/ भंडारा पत्रिका साकोली : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी बसपा तसेच अपक्ष उमेदवार प्रचार कार्यात पूर्ण जोमाने उतरले आहेत. प्रचारासाठी कमी कालावधी मिळाल्याने उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावोगावी मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू आहे. दिवाळी संपल्यानंतर मंडई निमित्ताने आयोजित होणाºया नाटक, दंडार, तमाशा आणि जलस्यानिमित्त होणाºया गर्दीचा फायदा घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी आपल्या उपस्थितीची नोंद करण्यास सुरुवात केली आहे.
प्रलोभनांचा पाऊस आणि विकासाचे दावे
प्रचाराच्या धामधुमीत एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांची फैरी झाडली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने देण्यात येत आहेत. निवडणुकीत लाडकी बहन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीचे फुकट तिकीट, महिलांना अर्ध्या किमतीत तिकीट आणि शेतकरी सन्मान निधी यांसारख्या घोषणांचा मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र, मतदारांमध्ये महागाई, बेरोजगारी, शेतमालाला योग्य भाव, सिंचन सोयी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली आॅनलाइन व्यवस्थेच्या समस्यांवर चिंता व्यक्त होत आहे.
धानकापणीच्या हंगामात शेतकºयांची व्यग्रता
धानकापणीच्या हंगामामुळे सध्या शेतकरी आणि मजूर वर्ग कापणी व मळणीच्या कामात व्यस्त आहे. त्यातच शेतकºयांची शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांच्या उशिरा सुरू होण्याबाबत चिंता आहे. उशीर झाल्यास, शेतकºयांना खाजगी व्यापाºयांना कमी दराने धान विकावे लागेल, ज्यामुळे त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागेल.