भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मानोरा : बंजारा समाजाला भाजपाने धर्मगुरु बाबुसिंग महाराज यांना विधान परिषदेचे प्रतिनिधित्व देऊन समाजाचा सन्मान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य करीत आहेत. काँग्रेस हा पक्ष देश विघातक कृतीला समर्थन देणारा आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी केले. ते तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील संत महांताच्या प्रमुख उपस्थितीत धर्मसभेत आज, १३ नोव्हेंबर रोजी बोलत होते. व्यासपीठावर आमदार बाबुसिंग महाराज, महंत कबिरदास महाराज, महंत यशवंत महाराज, महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज, संजय महाराज, कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सईताई डहाके, वाशीम – मंगरुळनाथ मतदार संघाचे उमेदवार श्याम खोडे, आमदार लखन मलिक, विधान सभा समन्वयक राजु पाटील राजे, राजु गुल्हाने, राजु काळे, रविकांत राठोड,रामेश्वर नाईक, दत्तराज डहाके, सुरेश गावंडे, महादेवराव ठाकरे, डॉ महेश चव्हाण, ओम बलोदे, राजु देशमुख, नंदू पवार, विजय काळे,श्याम चैतन्य महाराज, दिव्य चैतन्य महाराज, रामसिंग महाराज, सिध्दलिंग महाराज, अभिनव महाराज आदीसह इतरांची व्यासपिठावर उपस्थिती होती. योगी आदित्यनाथ पूढे म्हणाले की, हिंदू धमार्चे धर्मांतर करणारे विरोधकांचे कधीही ध्येय सफल होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधनाप्रती आम्ही प्रामाणिक आहोत.
आज राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षाच्या कार्याची जनतेने दखल घेतली आहे. देशात आज रेल्वे, मेट्रो यांचे मोठ्या प्रमाणात जाळे उभे झाले आहे. तसेच आयआयटी, मेडीकल कॉलेज, शुध्द पेयजल योजना, पीएम आवास योजना, राशन सुविधा संपूर्ण देशात मोदींनी उपलब्ध करून दिली आहे. यासह पाच लाख रुपयांची आरोग्य विमा सुविधा, अनेक गरीब कल्याणकारी योजना सुरू झाल्या आहेत, असेही ते म्हणाले. जनसमुदायाला संबोधित करताना योगीजी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व संभांजी महाराजांनी हिंदूत्वासाठी प्राणाची आहुती दिली. तर समता नायक महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या काळात अतोनात कष्ट भोगावे लागले. आघाडीची निती व नियत साफ नाही. राजकारण करत असताना मुस्लिम तुष्टीकरणाची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. महाविकास आघाडीची गाडी पंचर असून चालकाच्या सीटवर बसण्यासाठी लढाई सुरू आहे. बटेगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असा नारा देत महायुतीचे उमेदवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले.