भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या मांगली येथील सुकेश गजभिये यांच्या घराला बुधवारच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात घरातील संपूर्ण साहित्य जळाले. अगरबत्ती व्यवसायाचे मशीनही जळून खाक झाली. यात सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. विजेचे मीटर जळाल्याने शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. सुदैवाने हा प्रकार रात्रीच लक्षात आल्यामुळे मोठी हानी टळली आहे.
बेरोजगारीवर मात करण्यासाठी सुकेश गजभिये या तरुणाने गावातच आपला अगरबत्ती व्यवसाय सुरू केला होता. अगरबत्ती निर्मितीसाठी मशीन खरेदी करण्यात आली होती. घराशेजारी जुन्या घरात त्याने अगरबत्ती व्यवसायाचा कारखाना सुरू केला होता . या व्यवसायातून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू होता. दरम्यान, बुधवारच्या मध्यरात्री अगरबत्ती मशिनअसलेल्या घरालाच आग लागली. रात्री गाढ झोपेत असताना आग लागल्याचा प्रकार लक्षात आला. आगीचे लोळ निघाल्याने शेजारीही जागे झाले होते. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करूनही व्यवसाय मशीन व घरासह सर्व साहित्य जळून खाक झाले.