मोबाईलचा स्फोट होऊन शिक्षकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील सिरेगावटोला येथे मोबाईलच्या स्फोटामुळे मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतक शिक्षकाचे नाव सुरेश भिकाजी संग्रामे(वय ५४) असून, या घटनेत त्यांचे नातेवाईक नथुजी गायकवाड (वय ६७) गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सुरेश संग्रामे हे सानगडी येथील आठवडी बाजारातून भाजीपाला खरेदी करून आपल्या गावाकडे परतत होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास, नथुजी गायकवाड यांच्या सोबत मोटारसायकलने मांगली (किटाडी) येथे मंडईसाठी निघाले. सिरेगावटोला गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या केसलवाडा फाट्याजवळ संग्रामे यांच्या शर्टाच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे मोटारसायकलवरील दोघेही रस्त्यावर पडले.

सुरेश संग्रामे हे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा)पंचायत समिती अंतर्गत कसारी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी नवीन मोबाईल खरेदी केला होता. या दुदैर्वी घटनेमुळे त्यांच्या पत्नी, दोन मुले, मुलगी आणि मोठा आप्त परिवार शोकसागरात बुडाला आहे. या घटनेबाबत प्राथमिक माहितीनुसार मोबाईलचा स्फोटच या अपघाताला कारणीभूत असल्याचे दिसते. पुढील तपासासाठी पोलीस चौकशी आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *