प्रतिनिधी गोंदिया : महिनाभरपुर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेत पोलिसांना हवा असलेल्या चोराला स्थानिक गुन्हे शाखा व तिरोडा पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. चोरट्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विष्णु खोकण विश्वास (३४, रा. अरुणनगर, ता. अर्जुनी मोरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सविस्तर असे की, ७ नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते दहाच्या सुमारास तिरोडा येथील माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या घरी चोरी झाली होती. दागिने व रोख रक्कम असा १८ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासकार्य सुरू केले.
दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, तिरोड्याचे पोलिस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या नेतृत्वातील पथक आरोपींचा शोध घेत असताना घटनास्थळावरून प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनिय माहितीच्या आधारे १० नोव्हेंबर रोजी संशयावरून आरोपी रामन्ना उर्फ रामचंद्र पोचन्ना ठाकरे (३५, रा. देसाईगंज वडसा) याला ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याने यात मुख्य सूत्रधार अट्टल चोरटा विष्णु खोकण विश्वास असल्याचे सांगितले. प्राप्त माहितीवरून पथक गेल्या महिनाभरापासून गोंदिया, भंडारा, नागपूर जिल्ह्यासह तेलंगणा, छत्तीसगड राज्यात शोध घेत होते. अखेर अट्टल चोरटा विष्णु विश्वास याला देसाईगंज वडसा येथून ४ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ नग सोन्याचे बिस्कीट, दुचाकी व आरोपी रामन्ना ठाकरे याच्याकडून रोख २४ हजार ५०० रुपये असा २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निदेर्शान्वये तिरोडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मसराम, वनिता सायकर, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक गोपाल कापगते, पोलिस अंमलदार तुलसीदास लुटे, इंद्रजित बिसेन, संतोष केदार, तिरोडा येथील पोलिस हवालदार दीपक खांडेकर, खराबे, ठाकरे, गायकवाड तसेच तांत्रीक सेल गोंदियाचे सहायक पोलिस निरीक्षक ओमप्रकाश गेडाम, पोलिस अंमलदार संजू मारवाडे, योगेश रहिले, रोशन येरणे यांनी केली.