भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत मुख्याध्यापक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार, ७ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. त्यांच्यावर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुकुंदा श्यामराव ताजणे (५८) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मुकुंदा ताजने हे देवरी तालुक्यातील मुरदोली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. घटनेच्या दिवशी मंगळवारी दुपारी ३ वाजता ते आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३५ एक्यू ०९९७ ने मुरदोली येथून चिंचेवाडा येथे शालेय पोषण आहार आॅनलाइन माहितीच्या बैठकीकरिता जात होते. यावेळी मुरदोली येथे राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना देवरीकडून नागपूरकडे जाणाºया अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, त्यांच्यावर देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोंदिया येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवरी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे