‘१०८’ रुग्णवाहिका ठरली १,९०,९६९ रुग्णांची जीवनदायिनी

प्रतिनिधी गोंदिया : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाने १ मार्च २०१४ पासुन सुरू केलेल्या ‘१०८’ या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा तब्बल १९०९६९ रुग्णांनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे. खालील प्रामुख्याने घटना त्यात हल्ला९२१, जळणे/भाजलेले-४३५, हृदयरोग१७८२, पडणे-२१८४, विषबाधा-४१४७, प्रसुती/कळा-२३०५५, वीजघात-१२७, वैद्यकीय-१२४४०४, ईतर आजार-१४२२६, गंभीर जखमा-६५९८, आत्महत्या-९२ बाबत लोकांनी ‘१०८’ या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेला कॉल करुन लाभ घेतला असल्याची माहीती जिल्हा आपत्कालीन समन्वयक स्वाती पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने १ मार्च २०१४ पासुन जिल्ह्यात ‘१०८’ या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरु झाली असुन आता पर्यंत १ लाख ९० हजार ९६९ रुग्णांनी लाभ घेण्यात आलेला आहे. अगदी मोफत पद्धतीने दिल्या जाणाºया सेवेमुळे अपघातग्रस्त, बाळंतपणासाठी अडलेल्या महिला, विषबाधेसह इतर सर्वच प्रकारची वैद्यकीय मदत नागरिकांना वेळेत पोहोचू शकल्याने अनेकांना नवजीवन देण्याचे काम त्यामुळे साध्य झाले आहे. १०८ क्रमांकावर कॉल केल्यास अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेली अ‍ॅम्ब्युलन्स पेशंटच्या सेवेसाठी सुवर्णकाळात हजर होत आहे. अ‍ॅम्ब्युलन्समधील मशीनरीच्या सहाय्याने गोल्डन अवर्समध्ये पेशंटना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यापूर्वी आवश्यक उपचार मिळतात.त्यामुळे घटनास्थळापासून हॉस्पिटलपर्यंत पेशंटना स्वस्थता लाभत आहे. ‘जीपीआरएस’ प्रणालीमुळे कॉल आल्यास संबंधित डॉक्टरांना कळवून अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी सांगितले.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने जिल्ह्यात १५ रुग्णवाहिका कार्यरत असून सकाळ आणि रात्र सत्रांत वाहनचालक व वैद्यकीय अधिकारी त्यासाठी आरोग्य सेवा देत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे. या सेवेचा दळणवळणासाठी जिकिरीच्या ठरणाºया व अतिदुर्गम भागांमधील नागरिकांसह तालुका आणि शहरी भागातील नागरिकांसाठी ही सेवा मोफत असते. वैद्यकीय तातडीच्या वेळी १०८ क्रमांक डायल करून रुग्णवाहिकेची मदत घेता येते. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी या रुग्णवाहिका उपलब्ध असतात. फोन कॉल झाल्यानंतर कमीत कमी वेळेत रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचते. या सेवेबाबत जिल्ह्यात जनजागृती होत असून, वापरही वाढत आहे. १ मार्च २०१४ पासुन वेगवेगळ्या कारणांनी तब्बल १९०९६९ रुग्णांनी १०८ क्रमांक डायल करून रुग्णवाहिकेचा वापर केलेला आहे.

याबाबत बोलताना सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनीसांगितले, की या सेवेबाबत जनजागृती होत असून, कॉल्सचे प्रमाण वाढत आहे.वेळेत उपचार मिळाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आगामी काळात ही सेवा आणखी भक्कम आणि अचूक करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येतील.जास्तीत जास्त लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.वाघमारे यांनी केले आहे. रस्ता अपघात किंवा इतर कुठला अपघात, आग लागून कुणी भाजले, अचानक हृदयविकाराचा झटका आला किंवा एखाद्या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यावर ‘१०८’ डायल कर ना भाऊ, असेच अनेकांच्या मुखातून बाहेर पडते.एकूणच आपत्कालीन परिस्थितीत अनेकांना ‘डायल १०८ रुग्णवाहिका सेवेची आठवण येत असून, आता पर्यंत जिल्ह्यात तब्बल १९०९६९ गरजूंनी आरोग्य विभागाच्या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *