भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात दहशतवादविरोधी पथकाने आज दि. १७ जानेवारी २०२५ रोजी मोठी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाºया दोन वाहनांवर छापा टाकला. या कारवाईत एकूण १२,०५,४८० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरूल हसन (भा.पो.से.) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
माहितीमध्ये राजनांदगाव येथून एका दुधाच्या कंटेनर वाहनाद्वारे लाखनी येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले गेले होते. पोलीस अधीक्षकांनी दहशतवादविरोधी शाखेच्या पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील राजेगाव एमआयडीसी परिसरात पथकाने सापळा रचला.
सिद्धी इंडस्ट्रियल गॅस प्रोडक्ट्स कंपनीसमोरील रस्त्यावर हल्दीराम कंपनीचा दुधाचा टेम्पो क्रमांक एमएच ४० एके ५६४० व पांढºया रंगाची मारुती ओमनी व्हॅन क्रमांक एमएच ४० बीई ०६६८ ही थांबलेली आढळली. दोन्ही वाहनांमध्ये सुगंधित तंबाखू लोड करण्याची प्रक्रिया सुरू असताना पथकाने छापा टाकून दोन्ही वाहनांसह मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत टाटा टेम्पोचा चालक प्रशांत कृष्णराव खडसे (रा. नागपूर) व मारुती ओमनी व्हॅनचा चालक मुन्नेश्वर जानबा हारीकर (रा. पवनी, भंडारा)यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य मालक असपाक पठाण हा दुचाकीने घटनास्थळावरून फरार झाला.
पुढील कार्यवाही सुरू
सदर प्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक कार्यरत आहे.
जनतेला सहकार्याचे आवाहन
मा. पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सहन केले जाणार नाहीत, असे सांगितले आहे. तसेच अशा प्रकारच्या गैरप्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन केले आहे. माहिती देणाºयांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, याची ग्वाही देखील दिली आहे.
मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी शाखा भंडारा पथकाने सपोनि नागलोत, पो. हवा गभणे, पो. हवा वैद्य, पो. हवा तांडेकर, पोशि दमाहे आणि पोशि भुते यांच्या सहकायार्ने यशस्वीरीत्या पार पाडली.