भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मातृ शक्तीची ताकद अफाट ती ओळखली जायला हवी. कुटुंबच नव्हे तर देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आज मातृशक्ती मध्ये आहे. परमेश्वराने महिलांना सहनशीलता, सशक्तपणा दिला आहे. त्याला बळ देण्यासाठी भाजप कायम तुमच्या मागे आहे. महिलांना सशक्त करण्यासाठी भाजप सक्षम आहे, असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. पोलीस बहुउद्देशीय सभागृहात भाजप महिला आघाडीद्वारे हळदी कुंकू व भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर यावेळी शुभांगी मेंढे, गीता कोंडेवार, नलिनी कोरडे, मंजिरी पनवेलकर, माला बगमारे, कल्याणी भुरे, वर्षा साकुरे, चंद्रकला भोपे, शालिनी डोंगरे व आदी महिला उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून उपस्थित महिलांना हळदीकुंकू व वाण स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, भारतीय जनता पार्टी कायमच महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्यांना सक्षम करून पुरुषांच्या सोबतीने उभे करण्याचा आमचा मानस असून त्यादृष्टीने कायमच सकारात्मक प्रयत्न केले जात आहे. आज देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता महिलांमध्ये निर्माण झाली आहे. हे करताना देश, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचे सामर्थ्य ही महिलांमध्ये निर्माण झाले असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. महिलांना सामर्थ्यवान करण्याचे काम महायुतीचे सरकार करीत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या महिलांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पोषक ठरत आहेत. आज सशक्त आणि सामर्थ्यवान समाज घडविण्यासाठी मातृशक्तीची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी भारतीय जनता पार्टी खंबीरपणे पाठीशी असल्याचे यावेळी शुभांगी सूनील मेंढे यांनी सांगितले. इतरही मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.